आप्पासाहेब पाटील
सोलापूर : वीजचोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी महावितरणने आता ‘ॲक्शन मोड’वर आले आहे. मागील वर्षभरात सोलापूर शहरासोबतच जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी धाडी घालून वीजचोरीच्या २ हजार १६५ घटना उघड करण्यात आल्या आहेत. दरम्यान, विद्युत कायदा कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल वर्षभरात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूर शहरात सर्वाधिक वीजचोर आढळत आहेत. त्यानंतर अकलूज, सोलापूर ग्रामीणचा क्रमांक लागत असल्याचे महावितरण प्रशासनाने सांगितले.
वीजचोरीला आळा बसावा यासाठी महावितरणतर्फे वीजचोरी विरुद्ध सातत्याने मोठ्या प्रमाणावर मोहिमा राबविण्यात येतात. याउपरही काही वीजग्राहक नवनवीन युक्त्या वापरून विजेची चोरी करताना आढळून आले आहेत. आधीच थकबाकी वसूल न झाल्याने महावितरण आर्थिक अडचणींतून जात असताना, वीजचोरीमुळे महावितरणला आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे यापुढे महावितरण सोलापूर मंडला अंतर्गत वीजचोरांवर कठोर कारवाईसाठी धडक मोहीम राबविण्याचे निर्देश दिल्याचे महावितरण प्रशासनाने सांगितले.
------------
वीजचोरीसाठी अशीही चलाखी
वीजतारेच्या हुकद्वारे किंवा मीटरमध्ये फेरफार करून अनेकजण वीजचोरी करत असल्याचे निदर्शनास आले आहे. वीजचोरी उघड झालेल्या अनेक प्रकरणात या बाबी प्रामुख्याने समोर आल्या आहेत. अशा प्रकारे वीजचोरी करणाऱ्यांवर दंड वसूल करून फौजदारी कारवाई करण्यात येत आहे. शिवाय १२६ या कलमाखालील मोठ्या प्रमाणात वीजचोरी पकडण्यात आली आहे.
---
फौजदारी गुन्हा अन् जबरी दंड
वीजचोरी प्रकरणात ज्यांनी दंडात्मक रकमेसह चोरीच्या वीजवापराप्रमाणे संपूर्ण बिलाची रक्कम भरली नाही तर त्यांच्याविरुद्ध कलम १३५ नुसार फौजदारी कारवाई करण्यात येत आहे. तसेच वीजचोरीविरुद्ध नियमितपणे सुरू असलेली मोहीम आणखी वेगवान करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
---------------
- एकूण तपासणी - १० हजार १५०
- वीजचोरी उघड - २१६५
- युनिटची वीजचोरी - २ लाख ८२ हजार
- एकूण गुन्हे दाखल - ५
- याशिवाय १३५, १३६ नुसारही कारवाई केली असून, १८७२ वीजचोरांनी १८ लाख ८८ हजार ९०४ युनिटची चोरी झाल्याचे उघड झाले आहे.
-----------
वीजचोरांवर सातत्याने महावितरणच्या विविध पथकाद्वारे कारवाई करण्यात येत आहे. वीजचोरी आढळल्यास दंड ठोठावला जातो. त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येते. कारवाईसाठी टाळण्यासाठी रीतसर जोडणी घेऊनच विजेचा वापर करावा.
- संतोष सांगळे, अधीक्षक अभियंता, सोलापूर मंडल, महावितरण.