सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी-बीबीदारफळ रोडवर ट्रक व दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात उत्तर सोलापूर शिवसेना तालुका प्रमुख शहाजी भोसले (वय ५८) हे गंभीर जखमी झाले होते. मात्र, खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या घटनेने कोंडी गावावर शोककळा पसरली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी रात्री कोंडी-बीबीदारफळ रस्त्यावरून भोसले हे जात होते. रात्रीच्या वेळी त्यांच्या दुचाकीला अपघात झाला होता. अपघातानंतर त्यांच्यावर सोलापूर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे ते बेशुद्ध अवस्थेत होते. दोन दिवसांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर ही भोसले याचा मृत्यू झाला. भोसले यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुली, तीन लहान भाऊ, भावजया, पुतणे असा मोठा परिवार आहे. मृत शहाजी भोसले शिवसेनेचे उत्तर तालुकाप्रमुख व कोंडी गावचे माजी सरपंच होते. २०१४ साली तत्कालीन सरपंच शंकर पाटील यांच्या अकाली निधनानंतर, कोंडी गावच्या सरपंचपदी शहाजी भोसले यांची वर्णी लागली होती. गेल्या अडीच वर्षांपासून त्यांच्याकडे शिवसेना तालुका प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली होती.
-------
वर्षभरातच पिता-पुत्राचा मृत्यू...
गेल्या वर्षी कोरोनाच्या संक्रमणात त्यांचा एकुलता एक मुलगा शिवाजी भोसले याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या आघातामुळे गेल्या वर्षभरापासून भोसले खचले होते. एका वर्षाच्या कालावधीत पिता-पुत्रांच्या मृत्यूमुळे शोक व्यक्त केला जात आहे. अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे कोंडी गावावर शोककळा पसरली आहे.