सांगोला : पोटच्या मुलाने जन्मदात्या आईला मारहाण करून केबलच्या साह्याने तिचा गळा आवळून खून केला व मृतदेह गावातील बौद्ध समाजमंदिराच्या स्लॅबवर नेऊन आईने आत्महत्या केल्याचा बनाव केला. ही घटना गुरुवारी सकाळी १०च्या पूर्वी कडलास (ता. सांगोला) येथे उघडकीस आली. रतन शहाजी साळुंखे (५०, रा. कडलास, ता सांगोला) असे मृत मातेचे नाव आहे.
याबाबत पोलिस पाटील रघुनाथ विश्वंभर ननवरे (रा. कडलास) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी संशयित तुकाराम साळुंखे यास ताब्यात घेतल्याचे पोलिस निरीक्षक भीमराव खणदाळे यांनी सांगितले. याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी (दि. १६) रात्री आरोपीचे आईवडिलांची किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. भांडणाला वैतागून रतन साळुंखे या घर सोडून निघून आल्या होत्या.
रात्री आई घरात नसल्याचे पाहून रात्रभर आईची शोधाशोध केली असता ती कडलास गावातील एका मंदिरात झोपलेल्या अवस्थेत मिळून आली. यावेळी मुलाने आईस मारहाण करून तिचा केबलच्या साहाय्याने गळा आवळून खून केला आणि मृतदेह समाजमंदिराच्या स्लॅबवर गळ्याला केबल गुंडाळलेल्या अवस्थेत आईने आत्महत्या केल्याचा बनाव केल्याचे पोलिसांनी सांगितले.