सोलापूर : येथील दक्षिण सदर बझार परिसरात राहणाºया केतकी रमेश उडाणशीव (वय १४) या विद्यार्थीनीचा डेंग्यू सदृश्य आजाराने सोमवारी मृत्यू झाला. काँग्रेसच्या नगरसेवकांनी याप्रकरणी महापालिकेच्या आरोग्य विभागाला जबाबदार धरले असून प्रेत ताब्यात घेण्यास नकार दिला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, केतकीला रविवारी रात्री ताप आला होता. ती बेशुध्द पडली. तिला अश्विनी सहकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना सोमवारी सकाळी तिचा मृत्यू झाला. केतकीला डेंग्यू झाला असावा, असे आमच्या तपासणी अहवालातून दिसते. पण हा अहवाल एनआयव्हीकडे पाठविण्यात येईल. त्यानंतरच अधिकृतपणे बोलता येईल, असे अश्विनी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. राजेंद्र घुली यांनी सांगितले.
काँग्रेसच्या नगरसेविका फिरदोस पटेल रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. शहरात गेल्या एक महिन्यांपासून डेंग्यू आणि हिवतापाचे रुग्ण आढळून येत आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाय सुरू केले आहेत. मात्र यातून परिणाम दिसत नसल्याचे काँग्रेसच्या नगरसेवकांचे म्हणणे आहे. मागील वर्षी डेंग्यूने दहा जणांचा बळी गेला होता.