सोलापूर : उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीच्या भूंसपादनासाठी उत्तर सोलापूर व मोहोळ तालुक्यांच्या तुलनेत माढा तालुक्यातील बाधितांना चौपट नुकसान भरपाई द्यावे लागेल, असा अहवाल तालुका कृषी अधिकाऱ्यांनी सादर केला आहे. यासाठी कुर्डूवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीने फळे, भाजीपाला, धान्ये, कडधान्ये यांच्याकडून दिलेल्या बाजार भावाचा आधार घेण्यात आला आहे. जादा नुकसान भरपाई मिळविण्यासाठी हा खटाटोप करण्यात आल्याचा संशय महापालिका आणि स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीसाठी उत्तर सोलापूर, मोहोळ, माढा तालुक्यातील जमिनींचे तात्पुरते भूसंपादन होणार आहे. दीड वर्षांपासून सुरू असलेले हे काम अद्यापही पूर्ण नाही. भूसंपादन अधिकाऱ्यांनी बाधीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कृषी विभागाकडून मुल्यांकनाचे अहवाल मागवले. माढ्याच्या कृषी अधिकाऱ्यांकडून अहवाल येण्यास सर्वाधिक उशीर झाला. याबद्दल जिल्हा प्रशासनाने नाराजी व्यक्त केली. आता अहवाल सादर झाल्यानंतर कृषी मुल्यांकनावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. सोलापूर, पंढरपूर प्रमाणेच कुर्डूवाडी बाजार समिती मोठी आहे. परंतु, या बाजार समितीमध्ये सोलापूरच्या तुलनेत मोठा दर मिळतो असा दावा करण्यात आला आहे.
वरिष्ठ कृषी अधिकाऱ्यांनी घेतला होता आक्षेप
वास्तविक हा प्रकार जिल्हा कृषी कार्यालयातील काही अधिकाऱ्यांच्या लक्षात आला होता. माढ्याच्या कृषी अधिकाऱ्यांनी अडीच महिन्यांपूर्वी डाळिंब, द्राक्षे व इतर फळांचे सरासरी दर दुप्पट ते तिप्पट दाखविले होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावर संशय व्यक्त केल्यानंतर पुन्हा दर बदलण्यात आले. आता कमी दर दाखविले तरी सोलापूर व पंढरपूरच्या तुलनेत जास्त दिसत आहेत, असे महापालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. केवळ जादा नुकसान भरपाई मिळविण्यासाठी काही लोक हा खटाटोप करीत असल्याचा मनपा अधिकाऱ्यांचा सूर आहे.
कसे होते मुल्यांकन, आक्षेप काय?
बाधीत क्षेत्रातील इमारती व इतर मालमत्तांच्या नुकसान भरपाईचे मुल्यांकन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केले जाते. फळे, पिकांच्या नुकसान भरपाईचे मुल्यांकन कृषी विभाग करतो. कृषी अधिकारी दर निश्चितीसाठी जवळच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून फळ, पिकांचे सरासरी दर मागवून घेतात. उत्तर सोलापूर तालुक्यातील नुकसान भरपाईच्या मुल्यांकनासाठी सिध्देश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती, मोहोळसाठी मोहोळ कृषी उत्पन्न बाजार समिती तर माढा तालुक्यातील नुकसान भरपाईच्या मुल्यांकनासाठी कुर्डूवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीकडून दर मागवण्यात आले. सोलापूर आणि मोहोळच्या तुलनेत कुर्डूवाडी बाजार समितीच्या सचिवांनी फळ व पिकांचे दुप्पट ते तिप्पट दर दाखविले. या आधारे कृषी अधिकाऱ्यांनी नुकसान भरपाईच्या मुल्यांकनाचा अहवाल सादर केला. सोलापूरपेक्षा कुर्डूवाडीमध्ये सर्वच फळे, धान्य, कडधान्ये यांना जादा दर मिळतो का? दराचे आकडे फुगविण्यात आले आहेत, असा प्रश्न स्मार्ट सिटी आणि मनपाचे अधिकारी उपस्थित करीत आहेत.
रॅकेटचा संशय
राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या भूसंपादनासाठी मोहोळ आणि माढा तालुक्यातील बाधीतांना नुकसान भरपाई देताना जादा मुल्यांकन दाखविण्यात आल्याच्या तक्रारी यापूर्वी करण्यात आल्या होत्या. यामध्ये राजकीय नेते व अधिकाऱ्यांचे रॅकेट असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते करीत होते. त्यांनी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिले होते. समांतर जलवाहिनीच्या निमित्ताने या रॅकेटची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.
कोणत्या तरी एका तालुक्यात जादा मुल्यांकन दाखविल्याचे कळते. खात्रीशीर सांगता येत नाही. परंतु, हा विषय आमचा नाही. महापालिकेने भूसंपादन करुन आम्हाला जागा ताब्यात द्यायची आहे. हा विषय भूसंपादन अधिकारी आणि पालिकेचा आहे.
- त्रिंबक ढेंगळे-पाटील, कार्यकारी संचालक, स्मार्ट सिटी.
भूसंपादनात जादा मुल्यांकन दाखविल्याच्या तक्रारी आमच्याकडे नाहीत. मात्र शेतकऱ्यांकडून संयुक्त मोजणीबाबतच्या हरकती आहेत. सविस्तर अहवाल आल्यानंतर हरकतींवर सुनावणी घेणार आहोत.
- अरुण गायकवाड, भूसंपादन अधिकारी.