टेंभुर्णी : वैरण घेऊन घराकडे निघालेला छोटा हत्ती उजनी कॅनाॅलमध्ये पडून झालेल्या अपघातात ७ वर्षाच्या मुलीसह पित्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना माढा तालुक्यातील माळेगाव हद्दीत रविवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की मिटकलवाडी येथील सध्या रा. माळेगाव येथील तात्यासाहेब बाळासाहेब कोळी (वय २८) हा तरुण रविवार २० जानेवारी रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास खुरपण्याच्या स्त्रियांना शेतात सोडून एम एच ४५/ ०३१२ या क्रमांकाच्या मालवाहू छोटा हत्तीमध्ये जनावरांसाठी वैरण घेऊन मिटकलवाडी- माळेगाव उजनी कॅनॉल पट्टीवरून माळेगावकडे निघाला होता. कॅनॉलच्या एका वळणावर मायनर १४ जवळ टेम्पो पलटी होऊन कॅनॉलमध्ये पडला.
कॅनॉलमधून पाणी वाहत असल्याने टेम्पोमधून तात्यासाहेब कोळी व त्याची सात वर्षाची मुलगी यांना बाहेर पडता आले नाही. याठिकाणी लोकांची वर्दळ नसल्याने टेम्पो पाण्यात पडल्याचे लोकांच्या लवकर लक्षात आले नाही. सकाळी १०.३० वाजता लाईट आल्यानंतर लोक मोटार चालू करण्यासाठी शेताकडे निघाले असता त्यांना टेम्पो पाण्यात पडल्याचे लक्षात आले. यानंतर नातेवाईक व लोकांनी क्रेनच्या साह्याने टेम्पो बाहेर काढला असता तात्यासाहेब व मुलगी आरती मृतावस्थेत आढळून आले. नागनाथ भिकाजी कोळी यांनी याबाबतची खबर टेंभुर्णी पोलीस स्टेशनला दिली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक काजी हे करीत आहेत.------------तात्यासाहेब कोळी हे मूळचे मिटकलवाडी येथील रहिवासी असून सध्या ते माळेगाव येथे कुटुंबासह मोलमजुरी करून राहात होते. ते त्यांच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई- वडील व दोन मुली असा परिवार आहे.