सोलापूर : अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी रिक्षाचालकांसह दहा जणांविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार व अॅट्रॉसिटी कायद्यांर्गत गुन्हा दाखल झाला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. यामध्ये ५ ते ६ रिक्षा चालकांचा समावेश आहे.
अल्पवयीन मुलगी ही येथील एका कॉलेजमध्ये इयत्ता अकरावीमध्ये शिकत आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजता ती एका मंदिराजवळ रडत बसली होती. तेव्हा रस्त्याने जाणाºया एका व्यक्तीने तिला हटकले. बाळा तुला काय झाले आहे? अशी विचारणा केली तेव्हा तिने पोट दु:खत असल्याचे सांगितले. त्या व्यक्तीला मुलीवर काहीतरी विपरीत प्रसंग घडल्याचा संशय आला, त्यांनी तत्काळ विजापूर नाका पोलीस ठाण्याशी फोनवरून संपर्क साधला. एकेठिकाणी अल्पवयीन मुलगी रडत असून, तिची अडचण काय आहे जाणून घ्या, असे सांगितले. या फोनवरून महिला पोलीस मुलगी असलेल्या ठिकाणी गेले. तिला विजापूर नाका पोलीस ठाण्यात घेऊन आले. तिची सखोल चौकशी केली, त्यानंतर काय घडले याची विचारणा केली. मुलीने सुरुवातीला माहिती दिली नाही, मात्र तिला विश्वासात घेऊन चौकशी केली असता तिने तिच्यावर सामूहिक अत्याचार घडल्याचे सांगितले.
अल्पवयीन मुलगी जून महिन्यापासून रिक्षाने कॉलेजला येत होती. नेहमीच्या जाण्या-येण्यातून एकेदिवशी त्याने अज्ञात स्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. काही दिवसांनंतर दुसºया एका रिक्षाचालकाने तिच्यासोबत असाच प्रकार केला. तिसºया रिक्षाचालकानेही असाच प्रकार केला. मात्र काही दिवसांनंतर त्याने त्याच्यासोबतच्या ४ ते ५ मित्रांसमवेत अळीपाळीने अत्याचार केला होता. दीड महिन्यापूर्वी तिच्यावर निर्जन ठिकाणी सामूहिक अत्याचार झाला होता. तिच्यावर वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार झाल्याचे मुलीने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी अत्याचार करणाºयांची माहिती घेऊन शोध घेतला. माहिती मिळालेल्या आरोपींपैकी पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. दहा जणांविरुद्ध बाललैंगिक अत्याचार कलम ४, ६, ८ १0, भादंवि कलम ३७६-ड आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहायक पोलीस आयुक्त प्रीती टिपरे करीत आहेत. ---------विचारपूस केल्याने गुन्हा उघडकीस- आलेल्या फोनची तत्काळ दखल घेऊन पोलीस निरीक्षक हनुमंत शेंडगे यांनी पोलिसांना मुलगी असलेल्या ठिकाणी पाठवून दिले. मुलीला ताब्यात घेतल्यानंतर आपुलकीने तिची विचारपूस करण्यात आली. तिच्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती मुलीकडून जाणून घेण्यात आली. दिवसभर केलेल्या चौकशीनंतर आरोपींना अटक केली आणि सामूहिक अत्याचाराचा गुन्हा उघडकीस आला. मुलीला जर पोलिसांनी घरी पाठवले असते तर कदाचित हा गुन्हा उघडकीस आला नसता. दरम्यान, मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित पाच जणांना अटक केली आहे. अन्य पाच जणांचा तपास सुरू असून, त्यांनाही अटक केली जाईल. दहा जणांवर सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे सहायक पोलीस आयुक्त प्रीती टिपरे यांनी सांगितले.