सोलापूर : उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा येथील एका गावात शुद्धतेची परीक्षा देण्यासाठी गरम तेलात हात घालून नाणे कढण्यास लावणाऱ्या पती व अत्याचार करणाऱ्या दोघांविरुद्ध सोलापुरातील तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने सोलापुरात येऊन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना भेटून या ठिकाणीच फिर्याद घेण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती. त्यामुळे गुन्हा दाखल केला.
चारित्र्यता सिद्ध करण्यासाठी महिलेला गरम उकळत्या तेलात हात घालून नाणे काढून दाखवण्याची अघोरी प्रथा आहे. उकळत्या तेलातून नाणे काढताना हात भाजल्यास चारित्र्यहीन तर हात न भाजल्यास चारित्र्य संपन्न समजले जाते. अशीच परीक्षा परांड्यातील (जि. उस्मानाबाद) येथील एका महिलेला द्यावी लागली. परीक्षा देताना तिचा हात भाजून ती जखमी झाली. त्यामुळे तिने महिलेने पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर पतीला जेलमध्ये टाकण्याची धमकी देऊन परांडा पोलीस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याने अत्याचार केला व गावातील एका तरुणाने अत्याचार केल्याचा आरोप त्या महिलेने केला आहे. महिलेने सोलापूरच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे धाव घेतली होती. रात्री उशिरापर्यंत झिरो नंबरने गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो परांडा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात येणार आहे.