कुर्डूवाडी : कुर्डू (ता. माढा) येथे शनिवारी रात्री शेतातल्या साहित्यासह चारचाकी टमटम पळविणाऱ्या आरोपीला गुरुवारी पहाटे पोलिसांनी अटक केली. दुपारी लघुशंकेचे कारण सांगून तो चक्क पोलीस ठाण्याच्या आवारातून पाठीमागे पेट्रोल पंपाकडे असणाऱ्या भिंतीवरून उडी मारून पळून गेला. यामुळे पोलिसांत एकच खळबळ उडाली.
राहुल ज्ञानेश्वर माळी (वय २५, रा. वीटभट्टी, नेवासे बु, ता. नेवासा, जि. अहमदनगर) असे या पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या शोधासाठी येथील पोलिसांची विविध पथके विविध मार्गाने रवाना झाली आहेत. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत आरोपी पोलिसांच्या हाती लागला नाही. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, आरोपी राहुल माळी व इतर दोघे दशरथ माळी व दत्ता माळी हे आपल्या कुटुंबासह कुर्डू, ता. माढा येथील फिर्यादी तुकाराम विष्णू पायगण यांच्या शेतात गेल्या दहा महिन्यांपासून आठवडा पगारावर कामाला होते. शेतातील खोल्यांमध्ये त्यांची राहण्याची सोय केली होती. शनिवारी रात्री सर्व आरोपी फिर्यादीच्या शेतातील शेती अवजारे, घरगुती साहित्यासह चारचाकी टमटम (एम एच ४५ टी २२७९ ) असे एकूण तीन लाखांचे साहित्य घेऊन पळून गेले होते. याबाबत फिर्यादी तुकाराम पायगण यांनी सोमवारी दिलेल्या फिर्यादीवरून या सर्व आरोपींना त्यांच्या जिल्ह्यातील राहत्या पत्त्यावरून नेवासे जिल्हा अहमदनगर येथून अटक करून येथील पोलीस ठाण्यात गुरुवारी पहाटे आणले होते. दरम्यान, दुपारी दोन वाजता अटक केलेल्या आरोपींमधील राहुल माळी याने लघुशंकेला जाण्याचे कारण सांगून पोलिसांच्या हाती सर्वांसमोर तुरी देऊन पोलीस ठाण्याच्या पाठीमागील भिंतीवरून उडी मारून पळून गेला आहे. या घटनेची फिर्याद पोलीस हेडकॉन्स्टेबल धनाजी माळी यांनी पोलिसांत दिली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक हनुमंत वाघमारे करीत आहेत.
.......................
आठवडा बाजार असल्याने गर्दीचा फायदा घेतला
कुर्डूवाडीचा आठवडा बाजार दिवस असल्याने त्याला लागलीच पाठलाग करून पकडणे पोलिसांना कठीण गेले. त्यानंतर येथील सहायक पोलीस निरीक्षक विक्रांत बोधे यांनी आरोपी पळाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल केला व विविध पथके शोधासाठी रवाना केली आहेत.