मल्लिकार्जुन देशमुखे
सोलापूर : सध्या फसवणुकीचा नवा फंडा सुरू झालेला आहे. परराज्यातून मुली आणायच्या आणि लग्न जमवून द्यायचे. लग्नानंतर पैसे, दागिने घेऊन नवरीने धूम ठोकायची, असे प्रकार विविध जिल्ह्यात घडल्याचे ऐकिवात आहे. त्यामुळे सावधान, संपूर्ण चौकशी, माहिती गोळा करून पुढील पावले उचलून लग्न करा, अन्यथा पैसे मोजून शुभमंगल करायचे अन् लग्न होताच नवरी ‘सावधान’ असा प्रकार होईल तरी अशा लुटेरी दुल्हनपासून सतर्क राहिल्यास फसवणुकीचे प्रकार टाळता येतील.
मुलांची वये वाढू लागलीत.. मुलींची संख्या कमी झालीय..मुलांना विवाहासाठी मुली मिळेनात. याच समस्येचा फायदा दलाल, एजंट, काही बोगस विवाह संस्था घेऊ लागले आहेत. मुलगी दाखवून लाखो रुपयांची मागणी करायची. लाखो रुपये उकळले की मुलीने विवाह झाल्यावर पळून जायचे. मुलींचे आई-वडील, मुलींचे घर सर्व काही नकलीच. या नव्या फंड्याला असंख्य मुलं व त्यांचा परिवार बळी पडतोय. काहीजण पोलिसांकडे जातात तर काही जण समाजात इज्जत जाऊ नये म्हणून गप्प बसतात.
---------------
लग्नासाठी मुली मिळेनात...
आज अनेक समाजांमध्ये मुलींचे प्रमाण अत्यल्प आहे. मुलींचा जन्मदरदेखील मुलांच्या तुलनेत कमी असल्याने लग्नासाठी मुली मिळेनाशा झाल्या. अनेकदा मुलींकडून शेतकरी नको नोकरीवाला तोही शहरात राहणारा हवा, यासह अनेक अपेक्षा असल्यानेदेखील मुली मिळणे अवघड बनले आहे. त्यामुळे अनेकजण वय वाढत असल्याच्या चिंतेत लग्नाची घाई करून अनोळखी मुलीशी लग्न करण्यास तयार होतात; मात्र अशा मुलांची नंतर फसवणूक होते.
------------
लग्नासाठी अनोळखीला पैसे देऊ नका...
लग्न जमविण्यासाठी अनोळखी व्यक्तीला पैसे देऊ नका, अनेकदा पैसे घेऊन मध्यस्थी फरार होतात. आधी मुली मिळणे कठीण झाल्याने असे भामटे ठिकठिकाणी पाहावयास मिळतात. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे.
------------
कोठून आणल्या जातात या मुली...
अशा मुली परराज्यातून आणल्या जातात. अशा मुलींकडून फसवणुकीचे धंदे अनेक ठिकाणी सुरू असतात. केवळ लग्नाचे नाटक करण्यासाठी त्या मुलींना निश्चित असा मेहनताना दिला जातो. काम झाले की त्या गायब होतात. पैसे दिले, लग्न झाले, त्याच दिवशी नवरी गायब असे नवनवीन फंडे वापरून फसवणूक केली जाते.
-----------
सर्व समाजात विवाहयोग्य मुलींची वानवा आहे. त्यामुळे अनेक जण, मध्यस्थांच्या भूलथापांना बळी पडतात. मुलगी गरीब घरची असली तरी चालेल; मात्र मुलाचे हात तर पिवळे होतील, अशा वर पित्याच्या काकुळतीचा गैरफायदा घेतला जातो. लग्न होताच नवरी दागदागिने व रोख रक्कम घेऊन पोबारा करते. त्यामुळे अशा बतावणीला, भूलथापांना बळी पडू नका. जिल्ह्यातील विवाहयोग्य मुलांनी, पालकांनी याबाबत अधिक दक्ष राहून वधू मंडळीकडील सर्व बाबी नीट तपासून घ्याव्यात, तिची माहिती गोळा करून चौकशी करावी, योग्य वाटले तरच विवाह करावा.
- रणजितसिंह माने, पोलीस निरीक्षक, मंगळवेढा