सोलापूर/सांगोला - द्राक्षाचा माल उशिरा पोहोचल्याच्या रागातून परप्रांतीय व्यापाऱ्याने गाडीचालकास शिवगाळ व मारहाण करत डांबून ठेवले होते. तसेच, माझ्या नुकसानापोटी 2 लाख रुपये देईपर्यंत तुला सोडणार नाही, अशी धमकीही दिली. सोमवारी सकाळी 9 वाजता बिहारमधील पटना येथे ही घटना घडली.
याबाबत टेम्पो चालकाची पत्नी अयोध्या ज्ञानेश्वर कदम (रा. पिंपळी, ता. बारामती, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी बामणी येथील जोर्तिलिंग ट्रान्सपोर्टचे व्यापारी गोपाळ साळुंखे व पोपट साळुंखे, जत येथील व्यापारी गफूरभाईसह पटना-बिहार येथील व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. ज्ञानेश्वर कदम यांना १ फेब्रुवारीला बामणी येथील ज्योतिर्लिंग ट्रान्सपोर्टचे व्यापारी गोपाळ साळुंखे व पोपट साळुंखे यांनी जत येथून पाटणा, बिहार येथे द्राक्षे घेऊन जायचे आहे, असे सांगितले. त्यानंतर ज्ञानेश्वर कदम व क्लिनर मोहन मनोहर देवरे (रा. काटेवाडी, बारामती) हे एमएच ४२ /एक्यू १६३३ टेम्पो घेऊन सांगोला येथे गेले होते. ७ फेब्रुवारीला सकाळी ज्ञानेश्वर कदम यांनी पत्नीला फोन करून पटना येथे माल खाली केला; परंतु तेथील व्यापाऱ्याने माल उशिरा पोहचला, असे बोलून जबरदस्तीने टेम्पोची कागदपत्रे, चावी काढून सर्व टायरची हवा सोडली आहे तर माल उशिरा पोहोचवल्याबद्दल फोनवरुन शिवीगाळ करत आहेत. पाटण्याचे व्यापारी नुकसानीपोटी २ लाख रुपये मागत असून पैसे दिले नाहीतर टेम्पो व त्यांना सोडणार नाही, असा दम दिल्याचे सांगितले. ११ फेब्रुवारीला सांगोला येथे येऊन व्यापारी गोपाळ साळुंखे, पोपट साळुखें यांची भेट घेतली असता तुमच्या नवऱ्याने माल उशिरा पोहोचविल्यामुळे आम्हीच पाटण्याच्या व्यापाऱ्यांना तुमचा नवरा व क्लिनर यांना धरून ठेवण्यास सांगितल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.