सोलापूर : मामा जिवंत असताना भाच्याने त्याला मृत दाखवून जमीन परस्पर दुसऱ्याच्या नावावर करण्याचा प्रकार दक्षिण सोलापूर तालुक्यात बरूर येथे घडला आहे. या प्रकारानंतर संबंधित शेतकरी महसूल प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही त्याची दाद घेतली जात नाही, अशी निराशाजनक प्रतिक्रिया या शेतकऱ्याने व्यक्त केली.
दक्षिण सोलापूर तालुक्यात हा नवा प्रकार उघडकीस आला आहे. बोळकवठे येथील शेतकरी पैगंबर बंदगी नदाफ यांची बरुर येथे ०.९३ हेक्टर शेतजमीन आहे. पैगंबर नदाफ यांच्या भाच्याने तलाठ्याकडे दिलेल्या अर्जावरून या शेत जमिनीवरील पैगंबर नदाफ यांचे नाव कमी करण्यात आले आहे. भाच्याचे नाव नोंदवण्यात आले, असे संबंधित तलाठ्याने फेरफार नोंद वहीत नमूद केले आहे.
चार वर्षानंतर प्रकार उघडकीस
पैगंबर नदाफ यांनी बँकेत कर्ज प्रकरण करण्यासाठी आपल्या जमिनीचा उतारा काढला असता त्यांना हा धक्कादायक प्रकार समजला. चार वर्षांपूर्वी त्यांच्या नावावरची शेत जमीन परस्पर गायब करण्यात आली होती. याचा त्यांना थांगपत्ताही लागला नव्हता. सातबारा उतारा पाहताच पैगंबर नदाफ यांच्या पायाखालची जमीन सरकली.
आधी मृत्युपत्र केले सादर
पैगंबर नदाफ जिवंत असताना त्यांचे मृत्युपत्र तयार करण्यात आले. त्यानंतर नदाफ मयत झाल्याचा दाखला मिळवला. हा मृत्यू दाखला आणि त्याचे मृत्युपत्र तलाठ्याकडे सादर करण्यात आले. त्याच्या आधारे कोणतीही खातरजमा न करता ही शेतजमीन भाच्याच्या नावे केली, असे जिल्हाधिकाऱ्याकडे दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
माझी जमीन खोटे मृत्युपत्र जोडून परस्पर भाच्याच्या नावावर करण्यात आली. याबाबत मी सातत्याने मागणी करूनही माझे मृत्युपत्र आणि मृत्यू दाखला दिला जात नाही. फेरफार नोंदीची नक्कल मिळत नाही. मी मंद्रूप आणि दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयाकडे ही तक्रारी दिल्या; पण कोणीच दाद घेत नाही. जिल्हाधिकाऱ्यांनाही अर्ज दिला आहे
- पैगंबर बंदगी नदाफ, शेतकरी बोळकवठा
पैगंबर नदाफ यांनी त्यांच्या सातबारा उताऱ्यावरील नोंदीची तक्रार माझ्याकडे दिली आहे. ही नोंद करताना संबंधित गावच्या तलाठ्याने कोणती कागदपत्रे घेतली. त्यांनी जोडलेले पुरावे मागितले आहेत. मंडल अधिकारी परदेशी यांच्याकडे या प्रकरणाचा तपास सोपवला आहे.
- राजशेखर लिंबारे , अप्पर तहसीलदार , अतिरिक्त तहसील कार्यालय मंद्रूप