सोलापूर : कोविडमुळे मृत्यू पावलेल्यांच्या वारसदारांनी पन्नास हजार रुपयांच्या मदतीसाठी शासनाकडे स्वतंत्रपणे अर्ज केल्याने अर्ज मंजूर करताना प्रशासनाची देखील पंचाईत होत आहे. पन्नास हजाराचा खरा लाभार्थी मीच असून माझ्याच खात्यावर मदत जमा करा, असा दावा अनेकांनी केला आहे. यासोबत काहींनी कोविड-१९ या नावाने अर्ज दाखल केले, तर काहींनी फक्त कोविडची बिले जोडून अर्ज भरले. अशा बोगस अर्जांची संख्या चारशेहून अधिक आहे. एकीकडे अशा अर्जांची संख्या वाढत आहे, तर दुसरीकडे तांत्रिक अडचणी देखील मोठ्या प्रमाणात वाढतायत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तूर्त मदतीची प्रक्रिया थांबवली आहे.
कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांच्या वारसदारांना शासनाकडून ५० हजारांचे अनुदान देण्यात येत असून याकरिता शहर व जिल्ह्यातून मृतांच्या नातेवाइकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. सध्या प्राप्त होणाऱ्या अर्जावर घेण्यात येणाऱ्या निर्णयाचे कामकाज तांत्रिक कारणांमुळे ठप्प आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्र सरकारने कोरोना मृतांच्या नातेवाइकांना ५० हजारांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मृताच्या कायदेशीर वारसदारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासन स्तरावर याची कार्यवाही सुरू आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यातून मदतनिधीसाठी तब्बल ११ हजार अर्ज जिल्हा प्रशासनाकडे दाखल झाले आहेत. यातील ३७०० अर्जांना मंजुरी मिळाली आहे. उर्वरित अर्ज प्रलंबित असून यातील काही अर्ज परजिल्ह्यांतील असून काही अर्ज बोगस असल्याचे, तर काही अर्जांत तांत्रिक चुका असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा अर्जांवर निर्णय घेण्यात आला नाही.
एका प्रकरणात तर एकाच कुटुंबातील तिघा वारसदारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे प्रशासनासमोरही अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्रुटी आढळलेले सुमारे सात हजारांहून अधिक अर्ज प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. अशा त्रुटी आढळलेल्या नागरिकांना त्रुटींची पूर्तता करून पुन्हा अर्ज करण्यास सांगितले जात आहे.