मोहोळ : खेळत-खेळत गेलेल्या तीन चिमुकल्यांचा शेततळ्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवार, ९ मे रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मोहोळ तालुक्यातील शेटफळ येथे घडली.
विनायक भरत निकम (वय १२), सिद्धेश्वर भरत निकम (वय ८, दोघे रा. माचणूर) तर कार्तिक मुकेश हिंगमिरे (वय ५, रा. शेटफळ ) अशी मरण पावलेल्या चिमुकल्यांची नावे आहेत.
मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथील भरत निकम हे शेत मजुरीसाठी शेटफळ येथील भावजी मुकेश ज्योतिनाथ हिंगमिरे यांच्याकडे आले होते. दरम्यान, मागील काही महिन्यांपासून शेटफळ येथील महेश तानाजी डोंगरे यांच्या शेतात पत्नी रेश्मा व भरत काम करत होते. ९ मे रोजी ते दोघेही सकाळी मजुरीसाठी शेतात गेले होते. आई-वडील मजुरीसाठी गेल्यावर विनायक, सिद्धेश्वर आणि मामाचा मुलगा कार्तिक हे तिघेजण खेळत-खेळत दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास रस्त्यातच असणाऱ्या संतोष जनार्धन डोंगरे यांच्या शेततळ्याकडे पोहायला गेले. पाय घसरून तिघेही बालके शेतळ्यात पडून बुडून मरण पावली.
याबाबत कार्तिकचे वडील मुकेश ज्योतिनाथ हिंगमिरे यांनी मोहोळ पोलिसात खबर दिली असून याबाबत मोहोळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास हवालदार आदलिंगे करीत आहेत.
---
माझ्या काळजाची दोन्ही तुकडे देवानं कसं नेली...
सायंकाळी सहा वाजता आई-वडील कामावरून घरी आले असता मुलं नाहीत हे पाहून घाबरले. चौकशी करीत मुलांना शोधत आई रेश्मा शेततळ्याजवळ जाताच मुलांच्या चपला दिसल्या आणि त्या मातेचा धीर सुटला. माझ्या काळजाची दोन्ही तुकडे देवानं कसं नेलं... मला का नाही नेलं ... माझ्या बारक्या झब्याला भूक लागली असल... त्याला चटणी चपाती द्या हो... असा टाहो फोडत रेश्माने अश्रूला वाट मोकळी करून दिली.
--