सोलापूर/ टेंभूर्णी : माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथील ‘एमआयडीसी’ मधील मालट्रक अचानक शेताकडे धावू लागल्या. हा काय प्रकार आहे जाणून घेतला असता आतमध्ये बोगस डिझेल पंप सापडला. पोलिसांना पाहून शेतातून पळून जाणाऱ्या 'कोल्हे' ला पकडले. या पंपावर ११ रुपये कमी दराने डिझेल मिळत असल्याचे निदर्शनास आले. या प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ही डिझेल विक्री उघडकीस येऊ नये, यासाठी दोन टॅंकर जमीनीत पुरल्याचे निदर्शनास आले.
श्रीकृष्ण ऊर्फ दादा विजय कोल्हे (वय (३४), रमेश विजय कोल्हे ( दोघे रा. कोल्हे वस्ती, टेभुणी), शंकर राजाराम किर्ते (वय ४५ रा. बेंबळे ता. माढा) असे गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत. यातील रमेश कोल्हे हा फरार झाला आहे. टेंभुर्णी येथे एमआयडीसी पासून काही अंतरावर असलेल्या शेतामध्ये बेकायदा डिझेल विक्री सुरू होती. शासकीय दराने मिळणाऱ्या ८६ रुपये प्रति लिटर पेक्षा ११ रुपये कमी भावात ७५ रुपयाला डिझेल मिळत होते. कमी भावात डिझेल मिळत असल्याने एमआयडीसीमध्ये आलेले मालट्रक थेट शेताच्या दिशेने धावू लागले. हा प्रकार गेल्या तीन महिन्यांपासून सर्रासपणे सुरू होता. कोल्हे वस्तीवर बेकायदा डिझेलची विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना समजली. पोलिसांनी बुधवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास तेथे धाड टाकली. तेव्हा तेथे ट्रॅक्टरच्या टँकरमधून मालट्रकमध्ये डिझेल भरले जात होते.
पोलिसांनी श्रीकृष्ण ऊर्फ दादा कोल्हे व कामगार शंकर किर्ते या दोघांना ताब्यात घेतले. तर रमेश कोल्हे हा शेतातून पळून गेला. याप्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात अत्यावश्यक वस्तू अधिनियम कायदा १९५५ कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, सहाय्यक फौजदार ख्वाजा मुजावर, नीलकंठ जाधवर, पोलीस अमलदार नारायण गोलेकर, धनाजी गाडी, अक्षय दळवी, चालक समीर शेख, माढा तहसील येथील पुरवठा अधिकारी यांनी पार पडली.
सात लाखाचा मुद्देमाल जप्त
- कारवाई दरम्यान दोन लोखंडी डिझेल टाक्या, एक ट्रॅक्टर, सहा प्लास्टिक व लोखंडी बॅरेल, एक टँकर टाकी, एक टिल्लू मोटार, ५० लिटर डिझेल असा एकूण ७ लाख ९ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
- कोल्हे वस्ती वर मोठे खड्डे खणून दोन डिझेलच्या मोठ्या टाक्या जमिनी ठेवल्या होत्या. टाकीतून डिझेल काढून ट्रॅक्टरच्या टँकरमध्ये सोडले जात होते. ट्रॅक्टरच्या टँकरमधून पाईप द्वारे मालट्रक मध्ये सोडले जात होते. यासाठी पेट्रोल पंपावर असलेले नोझल मीटरचा वापर करीत होते.
मुंबईवरून येत होता डिझेलचा टँकर
- कोल्हे यांच्या वस्तीवर विकले जाणारे डिझेल मुंबईवरून येत होते. कोल्हे हा डिझेल ६५ रुपये प्रति लिटर दराने खरेदी करत होता व तो वस्तीवर आणून ७५ रुपये प्रति लिटरने विक्री करत होता. हे डिझेल केमिकलयुक्त असल्याचे बोलले जात असून तो वाहनांसाठी किती योग्य आहे याचा तपास केला जात आहे.
- एका माल मालट्रकमध्ये किमान २०० लिटर डिझेल घेतले जाते. यामध्ये ड्रायव्हरला अकरा रुपये प्रमाणे दोन हजार दोनशे रुपयाचे कमिशन मिळत होते. त्यामुळे मालट्रक चालकांनी डिझेल भरण्यासाठी कोल्हे वस्तीवर गर्दी करण्यास सुरुवात केली होती.