सोलापूर : शासकीय रुग्णालयात वेळेवर उपचारासाठी दाखल न करून घेतल्याने शास्त्री नगर येथील एका ६५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी यासंदर्भात सिव्हिल अधिष्ठातांकडून अहवाल मागवला आहे. कोविड नियंत्रण १९ कक्षाचे प्रमुख धनराज पांडे यांना शुक्रवारी यासंदर्भात सिव्हिलची तपासणी करण्यासाठी पाठवून दिले. हे प्रकरण आणखी तापण्याची शक्यता आहे.
मनपातील काही नगरसेवकांनी दिलेल्या माहितीनुसार शास्त्री नगरातील एका कुटुंबात कोरोनाचे रुग्ण आढळून आले. महापालिकेच्या दाराशा प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी २० जुलै रोजी या भागात सर्वेक्षणासाठी गेले. त्या कुटुंबातील आणखी एक ६५ वर्षीय व्यक्ती आजारी असल्याचे सांगण्यात आले. कुटुंबातील इतर सदस्यांना क्वारंटाईन केले होते. त्यामुळे आरोग्य कर्मचाºयांनी या व्यक्तीला दाराशा आरोग्य केंद्रात आणले. तिथे तपासणी केल्यानंतर या व्यक्तीला तातडीने उपचारासाठी दाखल करणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
आरोग्य विभागाच्या परिचारिका या व्यक्तीला घेऊन सोमवारी दुपारी दोन वाजता सिव्हिल हॉस्पिटलच्या कोरोना वॉर्डाजवळ दाखल झाल्या. ओपीडीमध्ये या व्यक्तीची तपासणी केली, मात्र रुग्णालयात बेड शिल्लक नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यादरम्यान, महापालिकेच्या रुग्णवाहिकेचे चालक आणि परिचारिका निघून गेल्या. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ही व्यक्ती सिव्हिलच्या ओपीडीमध्येच बसून होती. सोबत कोणीच नव्हते. या व्यक्तीला या ठिकाणी श्वास घ्यायला त्रास होऊ लागला.
दरम्यान, हा प्रकार मनपाचे उपायुक्त पंकज जावळे यांच्या कानावर गेला. जावळेंनी दाराशा आरोग्य केंद्रातील कर्मचाºयांना झापले. नगरसेवक बाबा मिस्त्री यांनाही सिव्हिलचे लोक सहकार्य करीत नसल्याबद्दल फोन केला. त्यानंतर मनपाच्या तीन परिचारिका सिव्हिलमध्ये दाखल झाल्या. बाबा मिस्त्री दाखल झाल्यानंतर डॉक्टरांसोबत चर्चा सुरू झाली. त्यानंतर तीन तास तिष्ठत बसलेल्या व्यक्तीला कोरोना वॉर्डात दाखल करण्यात आले. या वॉर्डातही या व्यक्तीला वेळेवर आॅक्सिजन मिळाला नाही. मंगळवारी या व्यक्तीचा मृत्यू झाला. या मृत्यूला केवळ शासकीय रुग्णालय नव्हे तर महापालिकेची यंत्रणा जबाबदार आहे, असा आरोप नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी केला. रुग्णालयात बेड शिल्लक आहेत की नाहीत, हे जाणून न घेताच आरोग्य सेविकांनी व्यक्तीला सिव्हिलमध्ये आणले. सिव्हिलमध्ये गोंधळ आहे हे तर आम्ही पूर्वीपासूनच सांगतोय. शहरात केवळ मोठमोठ्या बैठका आणि टेस्ट मोहीम घेण्याऐवजी कर्मचारी व्यवस्थित काम करतात की नाही, हे पाहणे गरजेचे आहे.
सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेणारमहापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्या आदेशानुसार नियंत्रण अधिकारी धनराज पांडे शुक्रवारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. कोरोना वॉर्ड, आयसीयू यांची पाहणी केली. यात त्यांना अनेक त्रुटी आढळल्या. मात्र त्यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला. दरम्यान, या कक्षातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात द्यावेत, अशी मागणी मनपा अधिकाºयांनी केली. अहवाल मागवलासिव्हिलमध्ये वेळेवर उपचार न मिळाल्याने शास्त्री नगरातील रुग्ण दगावल्याचे महापालिकेच्या आरोग्य कर्मचाºयांचे म्हणणे आहे. यासंदर्भात सिव्हिलच्या अधिष्ठातांना पत्र पाठवले आहे. त्यांच्याकडून या प्रकरणाचा अहवालही मागवून घेणार आहोत. - पी. शिवशंकर, आयुक्त, मनपा.