सोलापूर : जुने विडी घरकुल, सोलापूर येथील केकडे नगरातील दशरथ नागनाथ नारायणकर या तरूणाचा गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास खुन झाला होता. या खूनाच्या अनुषंगाने शहर पोलिस दलाची संपूर्ण टीम आरोपीच्या शोधासाठी परिपूर्ण तपास करीत होती. दरम्यान, प्रियकराच्या मदतीने पत्नीने आपल्या पतीचा खून केल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात समोर आली. त्यानंतर पोलिसांनी प्रियकर, खून झालेल्या तरूणाची पत्नी यास अटक केली आहे.
बाबासो जालींदर बाळशंकर (वय २७ वर्षे, रा. डोंबरजवळगे, ता. अक्कलकोट, जि. सोलापुर व अरुणा दशरथ नाराणकर (वय २९ वर्षे, रा. जुने विडी घरकुल, सोलापूर ) यांना गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. मयत दशरथ नागनाथ नारायणकर व त्याची पत्नी अरुणा नारायणकर यांच्याबाबत घटनास्थळावरुन तसेच त्यांचे मुळ गाव डोंबरजवळगे (ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) येथून गोपनीय बातमीदारांकडून माहिती प्राप्त केली. तपास पथकातील पोलीस अंमलदार यांचा संशय मयताची पत्नी अरुणा नारायणकर हिच्या कडे वळाला. मयताची पत्नी अरुणा नारायणकर हिचे प्रेमसंबंध बाबासो जालींदर बाळशंकर याच्याशी असल्याची माहिती मिळविली. बाबासो जालोदर बाळशंकर हा अरुणा नारायणकर हिला वारंवार भेटल्याची माहिती मिळाली. तसेच घटनेच्या दिवशीही सकाळी बाबासो बाळशंकर यास घटनास्थळाजवळ लोकांनी पाहिल्याची माहिती मिळाली.
त्यानंतर क्षीरसागर यांनी बाबासो जालींदर बाळशंकर याचे मोबाईल नंबर बाबत माहिती मिळविली. त्याचा मोबाईल बंद असल्याचे आढळुन आल्यानं त्याच्यावर अधिकच संशय बळावला. त्यानंतर संशयिताबाबत अधिक माहिती घेतली असता, तो देखील डोंबरजवळगा, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर येथे राहत असल्याचे समजले. तसेच घटना घडलेल्या रात्री तो त्याच्या राहत्या घरी नव्हता अशीही माहिती पोलिसांना मिळाली. बाबासो बाळशंकर यास मुळेगाव क्रॉसरोड येथून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्याकडे सखोल आणि कौशल्यपूर्वक तपास केला असता बाबासो बाळशंकर याने अरुणा नारायणकर हिचेशी गेली ७ ते ८ वर्षापासून प्रेमसंबंध असल्याचे कबुल केले. तसेच त्या प्रेमसंबंधातुन दशरथ नागनाथ नारायणकर याचा खुन मयताची पत्नी, अरुणा नाराणकर हिच्याशी संगणमत व कट करुन केल्याची कबुली दिली.
त्या अनुषंगाने, सपोनि क्षिरसागर यांनी आरोपी बाबासो जालींदर बाळशंकर याचे मोबाईलची पाहणी केली असता, त्यामध्ये मयताची पत्नी, अरुणा नाराणकर हिने त्यास पाठविलेल्या व्हॉट्सॲप चॅटची माहिती मिळाली. त्या चॅटवरुन आरोपी बाबासो जालींदर बाळशंकर याने अरुणा नारायणकर हिचेशी संगणमत करून, कट रचून, खुनाची पुर्वतयारी साठी झोपेच्या गोळ्या, नायलॉन दोरी व चाकु खरेदी करुन, दशरथ नागनाथ नारायणकर याचा खुन केला असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर, अरुणा नारायणकर हिचेकडे गुन्ह्याचे अनुषंगाने तपास केला असता, तिने प्रथम उडवा उडवीची उत्तरे दिली. मात्र, बाबासो बाळशंकर याचे मोबाईल मधील चॅट विषयी माहिती दिली असता, तिने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यामुळे बाबासो जालींदर बाळशंकर (वय २७ वर्षे, रा. डोंबरजवळगे, ता. अक्कलकोट, जि. सोलापुर व अरुणा दशरथ नाराणकर (वय २९ वर्षे, रा. जुने विडी घरकुल, सोलापूर ) यांना गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे करीत आहे.