सोलापूर : बँकेचे एटीएम कार्ड ब्लॉक करावे लागेल, असे सांगून ओटीपी नंबर विचारून घेतला. त्यानंतर, महिलेच्या बँकेच्या खात्यातून चार लाख ९४ हजार ९२ रुपये काढून घेतले. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अक्षदा हणमंत पाटील (वय २२ रा.उमा नगरी मुरारजी पेठ सोलापूर) या घरात असताना, त्यांच्या मोबाइलवर दि.१७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता अनोळखी व्यक्तीचा फोन आला. बोलणाऱ्या व्यक्तीने ‘मैं बैंक के क्रेडिट कार्ड डिपार्टमेंट से बात कर रहा हूं, आपका एटीएम ब्लॉक करना है. अगर आपने कार्ड ब्लॉक नही किया, तो आपके अकौंट से ५० हजार रुपये पे करने पडेंगे,’ असे म्हणाला. यावर फोन करणाऱ्या व्यक्तीने कार्ड संदर्भात माहिती दिली. कार्ड चालू राहिल्यास काय नुकसान होईल, याची माहिती दिली. अक्षदा पाटील यांना फोनवर बोलणारा व्यक्ती खरोखर बँकेतील आहे, असे वाटले. नुकसान टाळण्यासाठी काय करावे लागेल, याची माहिती अज्ञात व्यक्तीने दिली. त्याच्या बोलण्यावर अक्षदा पाटील यांचा विश्वास बसला.
दरम्यान, त्याने ‘आपको एक मेसेज आऐगा तो मुझे पढकर बताए,’ असे म्हणाला. अक्षता पाटील यांनी आलेला मेसेज विश्वासाने वाचून दाखविला, त्यात त्यांनी आलेला ओटीपी नंबरही सांगितला. ओटीपी नंबर समजताच, तत्काळ मोबाइलवर त्यांच्या खात्यातून चार लाख ९४ हजार ९२ रुपये ४० पैसे काढून घेण्यात आले. पैसे काढल्याचा मेसेज अक्षता पाटील यांना आला. आपली काहीतरी फसवणूक झाली आहे, असे त्यांच्या लक्षात आले. बँकेत चौकशी केली असता, खात्यातून पैस काढून घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी अक्षता पाटील यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तपास पोलीस नाईक पोळ करीत आहेत.
अनेक घटना घडूनही होत आहे फसवणूक
० गेल्या काही वर्षांपासून ऑनलाइन फसवणुकीच्या घटना घडत आहेत. याबाबत वर्तमानपत्रातून अनेक वेळा बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. लोकांना सावध राहण्याचे आवाहनही सायबर सेलच अधिकारी सातत्याने करत असतात. असे असतानाही अनेक महिला व पुरुष अशा फेक कॉलला फसतात. आपली सर्व माहिती सांगतात व फसवणूक करून घेतात. या प्रकारामुळे अश्चर्य व्यक्त केले जात आहे.