सुस्ते : उद्योगधंदासाठी पैसे उपलब्ध नसल्याने व कामात सतत अपयश येत असल्याने एका तरुणाने आयुष्याला कंटाळून १८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता घर सोडला. त्यानंतर मम्मी आज तुझ्या हातचा शेवटचा चहा पिऊन आलोय, असे म्हणत आईला फोन केला. त्यानंतर ४.१३ वाजता आत्महत्या करित असून माझ्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये, अशी चिठ्ठी व व्हिडिओ ५.४५ वाजता बहीण गौरी भोसले व सोमनाथ सालविठ्ठल यांच्या मोबाईलवर पाठवून जगाचा निरोप घेतला.
ओंकार नारायण सालविठ्ठल (वय २७, रा. सुस्ते) असे त्या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ओंकार सालविठ्ठल याचे शिक्षण एमबीएपर्यंत पूर्ण होऊनही नोकरी मिळत नाही. घरची परिस्थिती हलाकीची, वडील विठ्ठल साखर कारखान्यात नोकरी करत आहेत. घरच्या परिस्थितीचे भान ठेवून ओंकार नोकरीसाठी प्रयत्न करत होता. नोकरी भेटत नव्हती, नोकरीवर न अवलंबता त्यांनी स्वतःचा व्यवसाय उभा करायचा निश्चय केला होता. वडिलांची पावणेसहा एकर जमीन आहे. जमिनीवर बँकेचे कर्ज असल्यामुळे दुसरे कर्ज मिळत नव्हते. यामुळे आईवडिलांच्या जीवावर किती दिवस बसून खायचं, ही गोष्ट ओंकारला खटकत होती. याच नैराश्यातून त्याने आत्महत्या केली. त्याला अकलूज येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र १९ एप्रिल रोजी ओंकारचे निधन झाल्याची माहिती वडील नारायण सालविठ्ठल यांनी दिली. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ व बहीण असा परिवार आहे.
................
घरातील कर्ताधर्ता मुलगा गेला
शेतीत खर्च करून अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. शेतात पिकवलेल्या मालाला हमीभाव मिळत नसल्याने बँकेच्या कर्जाची परतफेड करू शकत नाही. बँका दुसरे कर्ज देत नाहीत. मुलाला स्वतःचा व्यवसाय सुरू करून देण्यासाठी पैसे मिळवण्याचा प्रयत्न केला; परंतु पैसे न मिळाल्याने घरातील कर्ताधर्ता मुलगा गेल्याची खंत मयत ओंकार सालविठ्ठलचे वडील नारायण सालविठ्ठल यांनी व्यक्त केली.