मंगळवेढा - पोलिसाच्या भितीने भयभीत होऊन पळून जात असताना चक्कर आल्याने तरूण युवकाचा मृत्यू झाल्याची घटना सोलापूर जिल्हायातील मंगळवेढा तालुक्यातील नंदूर येथे घडली आहे.
शुक्रवारी सकाळी पोलीस अधिकारी व कर्मचारी गावातील हेगडे यांच्या दारू धंद्यावर कारवाई करण्यासाठी येताच त्यांना पाहून नागेश नाथा हेगडे ( वय 22) हा युवक पळून जात असताना पाठीमागे पोलीस पाठलाग करत असल्याचे पाहून काही अंतरावर तो चक्कर येऊन कोलमडून खाली पडला.
त्यात तो बेशुद्ध झाला. त्याला गावातील डॉक्टराकडे नेले असता डॉक्टरांनी त्याला उपचार करणेसाठी मंगळवेढा रुग्णालयाकडे नेण्यास सांगितले. त्यानुसार महिला हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले तेथील डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले.
त्यानंतर मृतदेह मंगळवेढा पोलिस ठाण्यासमोर आणण्यात आला.आणि संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाईकांनी ठाण मांडले. जवळ पास 3 तास मृत्यूदेह गाडीत ठेवला होता.याची माहिती कळताच अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी भेट देऊन कुटुंबियांशी चर्चा करून चौकशी करून दोषी असणाऱ्या पोलीसावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे, सांगोला पोलीस निरीक्षक सुहास जगताप व पोलिस अधिकारी उपस्थित होते. याची फिर्याद वडिल नाथा हेगडे यांनी दिली. त्यानंतर तो मृत्यूदेह कुटुंबानी ताब्यात घेतला. याची सखोल चौकशी करण्यासाठी पंढरपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत कदम यांच्याकडे तपास देण्यात आला आहे.सदर मयताची नोंद सीआरपीसी 174 प्रमाणे अकस्मात म्हणून नोंद केली आहे.