सोलापूर : भवानी पेठेतील घोंगडे वस्तीत राहणाऱ्या ओंकार भीमाशंकर पद्मगोंडा या २४ वर्षीय तरुणाचा बळी गतिरोधकाने घेतला की, घरात असतानाच धाप लागल्याने मृत्यू झाला, याबाबत परिसरात उलटसुलट चर्चा ऐकावयास मिळत आहे. शवविच्छेदन झाले म्हणजे अपघाताचाच प्रकार असल्याचे काहींनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. दरम्यान, पीएम रिपोर्ट अन् त्याच्या सोबतच्या मित्रांची चौकशी करून कारवाई करणार असल्याचे जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब भालचिम यांनी सांगितले.
मार्केट यार्डासमोरून जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या गतिरोधकांची उंची खूपच अधिक आहे. रविवारी रात्री याच रस्त्यावरून येत असताना, ओंकार पद्मगोंडा हा दुचाकीवरून पडला. सोबत असलेल्या मित्रांनी त्याला तातडीने एका रुग्णालयात दाखल केले. हाताला खरचटल्याने तेथील डॉक्टरांनी मलमपट्टी केली आणि औषधे लिहून दिली. त्यानंतर, ओंकारला घरी आणले. घटनास्थळापासून ते रुग्णालय अथवा रुग्णालयत ते घरापर्यंतच्या मार्गावर त्याला उलट्या झाल्याचेही सांगण्यात येते. नाकातून रक्तस्त्राव झाल्याचेही काहींनी सांगितले.
घरी आल्यावर ओंकारला पुन्हा त्रास सुरू झाला. त्यानंतर, घरातील लोकांनी त्याला तातडीने त्याच रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वी तो मरण पावल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. याच डॉक्टरांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यास खबर देऊन धाप लागल्याचे कारण सांगितले. मग धाप लागून मृत्यू जरी झाला, तरी शवविच्छेदन कसे झाले, असा प्रश्नही ओंकारच्या वडिलांच्या काही मित्रांनी केला. ओंकार याच्या पश्चात वडील, एक भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.
सोबतच्या मित्रांची चौकशी होणार
ओंकार हा दुचाकीवरून कुठल्या मित्रासमवेत गेला. त्याच्यासोबत अन्य दुचाकीवर इतर मित्र होते का, याबाबत माहिती घेण्यात येईल. मित्रांची चौकशी करून नेमका प्रकार उजेडात आणण्यात येईल, घटना कुठे घडली. ती आमच्या की जेल रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत याचीही माहिती घ्यावी लागणार असल्याचे जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भालचिम यांनी सांगितले.
अनेकांचे बळी गेले...
मार्केट यार्डात जाण्यासाठी दोन प्रमुख प्रवेशद्वार आहेत. या प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावर असलेल्या गतिरोधकावरून जाणे म्हणजे जणू तारेवरची कसरत. मार्केट यार्डात दररोज शेकडो वाहने ये-जा करीत असतात. अपघात होऊ नये, म्हणजे ज्या पद्धतीने उंच गतिरोधक आहेत, त्याच गतिरोधकाने अनेकांचे बळी गेले. काही जणांना अपंगत्व आले. ओंकारचा बळी याच गतिरोधकाने घेतल्याचे यार्डातील व्यापाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला सांगितले.