सोलापूर : तुळजापूर रोडवरून येणाऱ्या चारचाकी कार, टेम्पो अन् मालट्रकला अडवून झीरो पोलिसाकडून वाहनांची तपासणी केली जात होती. वाहतूक शाखेचा कर्मचारी मात्र पुलाखालच्या सावलीमध्ये खुर्चीवर बसून झीरो पोलिसाकडून काम करून घेत असल्याचा प्रकार सोमवारी दुपारी निदर्शनास आला.
भर दुपारी १ वाजता जुना तुळजापूर नाका येथे सोलापुरात येण्याच्या रस्त्यावर बॅरिकेड्स लावण्यात आले होते. तुळजापूर, हैदराबाद रोडवरून शहरात येणाऱ्या प्रत्येक वाहनाला झीरो पोलीस थांबवत होता. वाहनांना अडवून त्यांच्याकडे कागदपत्रांची विचारणा करीत होता. कागदपत्र आहेत असे सांगितले तरी चालकाला घेऊन खाली उतरण्यास सांगितले जात होते. चालकाला नाक्याच्या जवळ असलेल्या उड्डाणपुलाच्या खालील वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्याकडे घेऊन जात होता. या प्रकारामुळे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत होती.
हा नेमका प्रकार काय आहे हे जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ची टीम तेथे थांबली. ‘लोकमत’चा कॅमेरा पाहताच वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्याने झीरो पोलिसाला आवाज दिला. रस्त्याच्या मध्ये लावलेले बॅरिकेड्स काढण्यास सांगितले. पुन्हा काही नसल्यासारखे पुलाखाली असलेल्या सावलीतील खुर्चीवर बसला. अडवण्यात आलेल्या वाहनचालकांना त्यांची कागदपत्रे परत करून जाण्यास सांगितले.
झीरो पोलीस पळाला
- ० ‘लोकमत’चा कॅमेरा पाहताच तेथे वाहनांची तपासणी करणारा झीरो पोलीस पळाला. तो लांबच्या अंतरावर जाऊन थांबला. हातात घेतलेली कागदपत्रे चालकाला परत दिली.
- ० बॅरिकेड्स लावून वाहनांना अडवले जाते, त्यांच्याकडे कागदपत्रांची मागणी केली जाते. वाहतुकीची कोंडी केली जाते. हा प्रकार नेहमी या ठिकाणी होत असल्याची माहिती स्थानिक लोकांनी दिली.
- ० फक्त बाहेरून सोलापुरात येणाऱ्या वाहनांनाच अडवून त्यांच्याकडे कागदपत्रे विचारली जातात.