सोलापूर : माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि आमदार सुभाष देशमुख यांनी होटगी रोडऐवजी बोरामणी विमानतळाकडे बोट दाखवणे म्हणजे सोलापूरकरांची दिशाभूल आहे. यातून शहरातील दोन पिढ्यांचं नुकसान होतंय, अशी टीका विमानतळ सल्लागार समितीचे माजी सदस्य केतन शहा यांनी केली.
महाराष्टÑ साहित्य परिषदेच्या जुळे सोलापूर शाखेच्या वतीने रविवारी सायंकाळी शिंदे आणि देशमुख यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम झाला. यावेळी त्यांना सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या बेकायदेशीर चिमणीबाबत प्रश्न विचारण्यात आला. दोघांनीही बोरामणी विमानतळाला प्राधान्य द्यायचा सूर आळवला. त्यावर शहा म्हणाले, सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी बेकायदेशीर असून ती पाडून टाका, असे न्यायालयाने सांगितले आहे. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होत असताना आमचे नेते या चिमणीला अभय देत आहेत.
आमदार सुभाष देशमुख यांनी धर्मराज काडादी यांची भेट घेतल्याचे सांगितले. कारखाना इतरत्र हलवावा. त्यासाठी राज्य शासनाकडून निधी मिळवून देतो वगैरे गोष्टी सांगितल्या. मग पुढे काय झाले? कोण करणार पाठपुरावा? कसा होणार विकास? भाजपने मागील वर्षात सोलापूरच्या विमानतळासाठी पैसे दिले नाहीत, असे सुशीलकुमार शिंदे यांनी मुलाखतीत सांगितले. वास्तविक भाजप सरकारने होटगी रोड विमानतळासाठी ३० कोटी रुपये दिले होते. या निधीतून विमानतळाच्या आधुनिकीकरणाचे काम झाले. उद्या सुद्धा या विमानतळावरून विमानसेवा सुरू होते. बोरामणी विमानतळासाठी किमान ८०० कोटी रुपये लागतील. कधी मिळतील एवढे पैसे? तुम्ही मुंबईत, सोलापुरात चार्टर प्लेन घेऊन येता तेव्हा किमान चार ते पाच लाख रुपयांचा खर्च येतो. उद्या विमानसेवा सुरू झाली तर तुमचाही खर्च वाचेल. सोलापुरातून चार लाख तरुण मुले स्थलांतरित झालीत. विमानसेवा नसल्यामुळे उद्योजक यायला तयार नाहीत. तरीही आमचे नेते लोकांची दिशाभूल करतात याचे वाईट वाटते, असेही केतन शहा म्हणाले.
शिंदे ‘बोरामणी’तून बाहेर पडत नाहीत; देशमुख ‘होटगी रोड’ विमानतळात जात नाहीत : वैद्य- ‘सोलापूर रंगे, नेत्यांच्या संगे’ कार्यक्रमातील दोन्ही नेत्यांच्या भूमिकेवर चार्टर्ड अकौंटंट श्रीनिवास वैद्य यांनीही कडाडून टीका केली आहे. ते म्हणाले की, या मुलाखतीत सगळ्यात कहर करणारा विषय होता तो होटगी रोड विमानतळाचा. सुशीलकुमार शिंदे बोरामणीच्या विमानतळाच्या परिसरातून बाहेर पडण्यास तयार नाहीत. सुभाष देशमुख होटगी रोड विमानतळाच्या प्रवेशद्वारातून आत जाण्यास तयार नाहीत. त्यातच चिमणीवर दोघांचे अतोनात प्रेम दिसून आले. सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना बेकायदेशीरपणे ही चिमणी उभी केली गेली आहे. सर्वोच्च न्यायालयापर्यंत ही चिमणी बेकायदेशीर असल्याचे शिक्कामोर्तब झालेले आहे. अशा या बेकायदेशीर चिमणीला सुभाष देशमुख पाठराखण करतात, ही लाजिरवाणी बाब आहे.
नुसतेच या बेकायदेशीर चिमणीचे समर्थन करून ते थांबले नाहीत तर सरकारी पैसा कारखाना हलविण्यासाठी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. हा तर कहरच झाला. कोणीही कसेही बेकायदेशीरपणे वागावे आणि त्याला सरकारी यंत्रणेत पाठबळ द्यावे. यातलाच हा प्रकार झाला. ज्या सभागृहात कायदे बनतात त्याच सभागृहातील सदस्य जर बेकायदेशीर बांधकामांना पाठबळ देत असतील तर पहिल्यांदा त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यायला हवा. त्या-त्या सदनामध्ये बसण्याचा यांना नैतिक अधिकार नाही आणि कायदेशीरपण नाही. सुशीलकुमार शिंदे यांनी बोरामणी विमानतळ आणि तेथील विमानसेवेबाबत जे विचार मांडले ते तर न पटणारे आहेत, असे यांनी नमूद केले आहे.
कुठे आहेत खासदार?- विमानतळाच्या विषयावर खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महाराज यांनी बोलायला हवे. त्यांनीच लोकसभेत या विषयावर प्रश्न विचारायला हवे. पण आमचे खासदार कुठे असतात आम्हालाच माहीत नाही, अशी टीकाही शहा यांनी केली.