अक्कलकोट : निम्म्या किमतीत मोठमोठे साहित्य देण्याचे आमिष दाखवून अक्कलकोट येथील ब्यागेहळ्ळी रोडवरील अय्या ट्रेडर्स नामक दुकानदाराने शहर व तालुक्यातील तब्बल ७०० ते ८०० लोकांना २ कोटींहून अधिक रकमेला गंडा घालून भरदुपारी जागा सोडून पसार झाला आहे. ही घटना सोमवारी ११ मार्च रोजी उघडकीस आली.
बॅगेहळ्ळी रोडवरील एका गाळ्यात १८ फेब्रुवारी रोजी बनावट कागदोपत्राद्वारे समर्थनगर ग्रामपंचायतीकडून ना हरकत प्रमाणपत्र घेतले. त्याआधारे एका गाळा मालकाकडून जागा भाड्याने घेतली. दुकानासमोर अय्या ट्रेडर्स असे फलक लावून फ्रीज, टीव्ही, खुर्ची, टेबल, बेड, मिक्सर, इस्त्री, सोफासेट, भांडीकोंडी अशा मोठमोठ्या किमतीचे अनेक प्रकारचे साहित्य केवळ पन्नास टक्के किमतीवर देण्याचे आमिष दाखवून, बुकिंग घेण्यास सुरुवात केली.
दुसºया दिवसांपासून मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी पडू लागली. याचे वारे अक्कलकोट शहरासह, ग्रामीण भागात गेले. बघता-बघता ७००-८०० लोकांनी ज्यांच्या-त्यांच्या आवडीचे साहित्य निम्म्या किमतीच्या दराने रक्कम भरून बुकिंग केले. असा प्रकार ११ मार्च म्हणजेच १८ दिवस चालू होता. त्यानंतर सोमवारी दुपारी संबंधित माणसे भरदुपारी बारा वाजता दुकानाचे शटर बंद करून निघून गेली. मंगळवारी सकाळी काही माणसं साहित्य घेऊन येण्यासाठी तर काहीजण बुकिंग करण्यासाठी गेले असता, गबाळ गुंडाळून पसार झाल्याचे लक्षात येताच, काही वेळातच शेकडो जण जमा होऊन दुकानाचे शटर उचकटून दुकानातील साहित्य घेऊन गेले. त्यानंतर हे वृत्त पोलिसांना कळताच पोलीस व्हॅन येईपर्यंत नागरिकांनी सर्व साहित्य घेऊन गेलेले होते. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
५८ हजार किमतीच्या मोबाईलसाठी २८ लोकांनी केले बुकिंगत्या भामट्यांनी आधार कार्ड, जीएसटी नंबर, शॉप अॅक्ट लायसन्स याद्वारे ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र घेतले होते. त्याचा आधार क्रमांक-९५४१९४०३२९३ असा आहे. सुरुवातीला कमी किमतीचे साहित्य बुकिंग झाल्याबरोबर तत्काळ आणून देत होता. या माध्यमातून ग्राहकांचा विश्वास संपादन केला होता. ५८ हजार किमतीच्या मोबाईलसाठी २८ लोकांनी बुकिंग केले होते. या प्रकरणात काही पोलीस कर्मचारी, अधिकारी, सधन व्यापाºयांचा समावेश असल्याची सध्या चर्चा सुरू आहे. दुकानदार पळून जाण्याच्या आदल्या दिवशी पाच ते १० लाख किमतीच्या साहित्याची खरेदी केली होती. त्यानंतर तो पसार झाला आहे.
घटना घडलेली खरी आहे; मात्र ज्यांची फसवेगिरी झालेली आहे. त्यापैकी कोणीही तक्रार देण्यासाठी आले नाहीत. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला नाही. तरीही जागा मालकांना बोलावून चौकशी चालू केली आहे. तक्रार येताच गुन्हा दाखल करून चौकशी करू.-के. एस. पुजारी, पोलीस निरीक्षक, उत्तर पोलीस ठाणे, अक्कलकोट