रत्नागिरी : रत्नागिरी शहरात सोमवारी रात्री झालेल्या १२ दुकानफोड्यांप्रकरणी सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेल्या आरोपीला मंगळवारी रात्री नागरिकांनीच पकडले. त्याची चांगलीच धुलाई करून त्याला शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मूळचा सोलापूर येथे राहणारा ५२ वर्षीय आरोपी १५ दिवसांपूर्वीच दोन वर्षांची शिक्षा भोगून सुटला होता. त्यानंतर या चोरी प्रकरणात त्याला अटक झाली आहे. त्याला बुधवारी न्यायालयात हजर केले असता ६ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मंगळवारी शहर बाजारपेठेतील १२ दुकाने फोडण्यात आली. त्यातून मोठ्या प्रमाणात वस्तू व रकमेची चोरी झाली नव्हती. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात दुकानफोड्या झाल्याने शहरातील व्यापारी वर्गात घबराट निर्माण झाली होती. मुकुंद प्लाझातील बारमध्ये चोरी करताना चोरट्याचे फुटेज मिळाले होते. हे फुटेज सोशल मीडियावरून सर्वत्र पसरल्याने चोरट्याचा चेहरा सर्वांना ओळखीचा झाला होता. मंगळवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास शहरातील कॉँग्रेस भवनजवळील रस्त्याजवळ एका रिक्षाचालकाशी कोणीतरी हुज्जत घालत असल्याचे दिसून आले. त्यामुळे तेथील नागरिकांचे लक्ष वेधले गेले. ही घटना पाहणाऱ्या एका व्यक्तीने भांडण करणाऱ्या त्या व्यक्तीस हाच तो दुकानफोड्यांतील चोरटा असल्याचे ओळखले व रिक्षावाल्यास त्याला आत घेण्याचा इशारा केला. त्यानंतर काहीजणांनी रिक्षाजवळ जात त्या भांडण करणाऱ्यास तो रात्री कोठे होता, अशी विचारणा करत त्याची धुलाई केली व पोलिसांच्या ताब्यात दिले. मंगळवारी रात्री दहा वाजता पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याकडे चोरीतील ७९० रुपयांची चिल्लर, दोन स्क्रू ड्रायव्हर, एक कोयती, एक सुरा व एक लोखंडी पोपटपाना पोलिसांनी जप्त केला. रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यातच या आरोपीवर दोन गुन्हे दाखल आहेत. २०१३ मधील एका गुन्ह्यात त्याला दोन वर्षांची शिक्षा झाली होती. दुसरा चोरीचा गुन्हाही त्याच्यावर दाखल होता. (प्रतिनिधी) आरोपीच्या तोंडात ब्लेड...!मंगळवारी रात्री अटक केल्यानंतर आरोपीला कारागृहात ठेवण्यात आले होते. मात्र, त्याच्या तोंडातून रक्त येत होते. त्यामुळे पोलिसांना त्याचा संशय आला. तपासणीत त्यांच्या तोंडात दाढेच्या बाजूला ब्लेड लपवून ठेवलेले आढळले. गाल दाबला की ब्लेड आतील त्वचेला लागून त्यातून रक्त येत होते. त्यामुळे रात्री त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्यानंतर बुधवारी न्यायालयात हजर केले.
दुकानफोड्यांतील चोरटा अटकेत
By admin | Published: October 01, 2015 12:26 AM