टेंभुर्णी : जेथे सर्व्हिस दिली जाते ते सर्व व्यवसाय वगळून इतर सर्व दुकाने, परमिट रूम व वाइन शॉप, पार्सल सुविधांसह सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्याचे सुधारित आदेश जिल्हाधिकारी यांनी काढावेत, अशी मागणी शिवसेनेचे नेते संजय कोकाटे यांनी केली आहे.
याबाबत कोकाटे यांनी जिल्हाधिकारी यांना एक निवेदन सादर केले आहे. मिनी लॉकडाऊनमुळे अनेक छोट्या व्यावसायिकांचे खूप मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. तसेच दुकानात काम करणा कर्मचाऱ्यांवरही आर्थिक संकट ओढावणार आहे.
काही निष्काळजी लोकांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होत असून, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. दोन-चार दुकाने सील झाल्यावर त्याचा परिणाम इतर सर्व व्यावसायिक व नागरिकावर होईल. याबाबत सुधारित आदेश काढून ज्या ठिकाणी सर्व्हिस दिली जाते ते सर्व व्यवसायवगळून इतर सर्व दुकाने, परमिट रूम व वाइन शॉप, पार्सल सुविधांसह सकाळी ९ ते सायंकाळी ७ पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी कोकाटे यांनी केली आहे.