सोलापूर : सोलापूर शहरातील सर्व प्रकारची दुकाने रविवारी बंद नव्हे तर चालू ठेवता येतील, असे महापालिका उपायुक्त अजयसिंह पवार यांनी 'लोकमत'ला सांगितले.
महापालिकेने शुक्रवारी मॉल, मार्केट कॉम्प्लेक्स पाच ऑगस्टपासून खुले करण्याबाबतचे आदेश दिले. हा आदेश देताना रविवारी शहरातील दुकाने बंद राहतील, असे सांगितले होते. परंतु, यात बदल करण्यात आला आहे. महापालिकेने ८ जुलै रोजी दुकानांची वेळ वाढविण्याबाबत आदेश काढले होते. या आदेशनुसार शहरातील सर्व मार्केटस् सात दिवस सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या आदेशानुसार रविवार, २ ऑगस्ट रोजी दुकाने खुली ठेवता येतील. सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेतच दुकाने चालू राहतील याची दक्षता दुकानदारांनी घ्यावी. दुकाने खुली करताना सम-विषम तारखेचा फॉम्युर्ला कायम राहील, असेही पवार यांनी सांगितले.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शहरात १७ ते २६ जुलै असे दहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला होता. २७ जुलैपासून पुन्हा व्यवहार सुरू झाले. रविवारी दुकाने बंद राहतील असे प्रशासनाने कळविल्यामुळे दुकानदार नाराज झाले होते. या निर्णयामुळे शहरातील दुकानदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.