तालुक्यात आतापर्यंत कुर्डूवाडी या ठिकाणी एकच कोविड केअर सेंटर उपलब्ध होते. त्यामुळे तेथील रुग्णसंख्येची मर्यादा पूर्ण झाल्याने अनेक बाधित रुग्णांना आपल्या घरी किंवा इतर खाजगी दवाखान्यात पुढील उपचारासाठी दाखल व्हावे लागले आहे. त्यामुळे येथील आरोग्य विभागाने आता कुर्डूवाडीनंतर माढा येथे दोन तर टेंभुर्णी येथे एक अशी एकूण तीन कोविड केअर सेंटर्स सध्या सुरू केले आहेत, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी थोरात यांनी सांगितले आहे.
एकीकडे लोकांची मानसिकता तयार करण्यात आरोग्य यंत्रणेला यश आल्याने रुग्ण लसीकरण केंद्राकडे वळत असताना लसीचा तुटवडा असल्याने लोक आल्या पावलाने परतू लागले आहेत. तालुक्यात माढा, कुर्डूवाडी, मोडनिंब, टेंभुर्णी, पिंपळनेर, उपळाई बु., परिते, आलेगाव, मानेगाव, रोपळे (क) अशा एकूण १० केंद्रांमध्ये लसीकरण देण्याचे काम सुरू आहे. कुर्डूवाडी ग्रामीण रुग्णालयांमध्ये ३ फेब्रुवारी ते ५ एप्रिल २०२१ दरम्यान एकूण लसीकरण ४ हजार २९७ झाले असून यात पहिला डोसचे ३ हजार ६२८ व दुसऱ्या डोसचे ६६९ असे लसीकरण आतापर्यंत करण्यात आले आहे. तरी लवकर कोविड प्रतिबंधात्मक लस येथील सर्व केंद्रांत उपलब्ध करून नागरिकांना सेवा द्यावी, अशी मागणी होत आहे.
-----
पाच हजार डोसची मागणी
सध्या माढा तालुक्यात कोविड प्रतिबंधात्मक लसीचे डोस उपलब्ध नाहीत. जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे ५ हजार डोसची मागणी केली आहे. मागणीनुसार डोस उपलब्ध होतील. लस उपलब्ध झाल्यानंतर गुरुवारी सकाळपासून लसीकरण पूर्ववत होईल, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी थोरात व वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनंदा गायकवाड यांनी सांगितले.
----
कोट-
कुर्डूवाडी येथील श्रीराम मंगल कार्यालयात सध्या बाधित रुग्णसंख्या जास्त झाल्याने अडचण निर्माण होऊ लागली आहे. येथील केअर सेंटरमध्ये सध्या ९० बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत १ हजार ५४० कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत. आता तालुक्यात माढा व टेंभुर्णी येथे नव्याने कोविड केअर सेंटर्स सुरू झाली आहेत. त्यामुळे आता बाधित रुग्णांंना अडचण भासणार नाही.
- डॉ. शुभम खाडे,
प्रमुख वैद्यकीय अधिकारी, कोविड केअर सेंटर, कुर्डूवाडी
................