सोलापूर : कोरोना आजाराच्या गंभीर रुग्णावर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणाºया रेमडेसिविर औषधांचा सध्या तुटवडा निर्माण झाला आहे. येत्या चार दिवसांमध्ये जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात रेमडेसिविर औषध उपलब्ध होईल, असे औषध निरीक्षक नामदेव भालेराव यांनी सांगितले.
गंभीर रुग्णांना विषाणूंचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने त्याचे प्रमाण कमी करण्यासाठी ‘रेमडेसिविर’ हे इंजेक्शन देण्यात येते. रेमडेसिविर हे अँटीव्हायरल इंजेक्शन आहे. या इंजेक्शनची निर्मिती फक्त काहीच कंपन्यांमार्फत होते. औषधासंबंधी काही त्रुटी निर्माण झाल्यामुळे केंद्रीय मंत्रालयाच्या ड्रग कंट्रोल अॅथोरिटीने बॅचेस रद्द केल्या होत्या. त्यामुळे तात्पुरता तुटवडा निर्माण झाला आहे. हा तुटवडा काही दिवसांमध्ये दूर होईल. सार्वजनिक आरोग्य विभागाने या औषधांच्या आॅर्डर दिल्याचे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले होते. शासनातर्फे कंपनीच्या अधिकाºयांशीही चर्चा झाली आहे.
पुण्यातील विभागीय कार्यालयाने रेमडेसिविर औषध मागविले आहे. त्यातील काही स्टॉक सोलापूर जिल्ह्याला मिळणार आहे. औषध निर्मिती कंपनी इतर कुणालाही औषध देण्यापेक्षा थेट कोविड रुग्णालयापर्यंत औषध देणार आहे. यात कुणाचाही हस्तक्षेप असणार नसल्याचे भालेराव यांनी सांगितले.
रुग्णालयाकडे या औषधांचा पुरेसा साठा नसल्याने त्यांचे नातेवाईक शहरातील प्रत्येक औषध विक्रीचे दुकान फिरत आहेत. इतके करूनही औषध मिळत नसल्याची खंत रुग्णाच्या नातेवाईकांनी बोलून दाखविली. सध्या शहरात सात ठिकाणी तर बार्शीमध्ये एका ठिकाणी रेमडेसिविर औषध विक्रीची परवानगी दिली आहे. ही औषध विक्रीची दुकाने कोविड रुग्णालयांशी संबंधित असल्याने ही परवानगी देण्यात आली आहे.