टीका करताना भान ठेवून बोलायला हवं ; शिवराज पाटील-चाकुरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 10:26 AM2019-03-30T10:26:39+5:302019-03-30T10:29:48+5:30
आंबेडकरांच्या नातवाने राज्य घटनेचा खून केला - सुशीलकुमार शिंदे
सोलापूर : डॉक्टर इमारत बांधू शकत नाही, गायक रोगी बरा करू शकत नाही, तसे राजकारणाचा आणि प्रशासनाचा अनुभव नसणारा लोकप्रतिनिधी निवडून देण्याचा काय उपयोग? असा सवाल करीत माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांनी भाजपच्या उमेदवाराला अप्रत्यक्ष लक्ष्य केले. टीका करताना भान ठेवून बोलायला हवं, असा इशारा त्यांनी सत्ताधाºयांना दिला.
काँग्रेस - राष्ट्रवादीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचाराचा प्रारंभ करताना चाकूरकर बोलत होते़ दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर येथील सोमेश्वर आणि बनसिद्धेश्वर मंदिराच्या प्रांगणात हा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी बोलताना चाकूरकर यांनी सत्ताधारी भाजप नेत्यांच्या वक्तव्यांचा समाचार घेतला. देशात ७० वर्षे काहीच झाले नाही असे म्हणणे देशातील जनतेची दिशाभूल करण्यासारखे आहे़ गेल्या साडेचार वर्षांत भाजप सरकारने नेमके काय केले? याचा शोध घ्यावा लागेल़ आरोप करणे खूप सोपे असते़ काम करणे महाकठीण, याचा प्रत्यय केंद्रातल्या सरकारला येत असावा़ आश्वासनं देणं सोपं, पण ती पाळताना किती कसरत करावी लागते याचा अनुभव आम्हाला आहे़ सरकारने दिलेली आश्वासने पाळली नाहीत, असा आरोप त्यांनी केला.
हल्ली गांधी-नेहरु घराण्यावर सत्ताधारी पक्षाची मंडळी तोंडसुख घेत आहेत, असे सांगताना चाकूरकर म्हणाले, नेहरू यांच्याविषयी अपशब्द वापरणं हे नेहरुंवर नव्हे तर देशावर अन्याय करणारं ठरेल. शेतकरी, शेतमजूर हा या देशाचा कणा़ तोच आता खिळखिळा बनत चालला आहे़ त्याला जबाबदार कोण? असा सवालही चाकूरकरांनी केला.
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीविषयी बोलताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले, ते माझे चांगले मित्र आहेत़ बाबासाहेबांनी घटना लिहिताना सर्वधर्मसमभाव हा या देशाचा पाया असल्याचे नमूद केले़ पण आमचे मित्र जातीयवादी शक्तीबरोबर गेले, याचे मला खरे दु:ख आहे़ एमआयएमसारख्या जातीयवादी शक्तींनी हा देश खिळखिळा केला़ त्यांची सोबत करायला नको होती.
उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात झालेल्या कार्यक्रमावेळी आ़ सिद्धाराम म्हेत्रे, आमदार प्रणिती शिंदे, आ़ रामहरी रुपनवर, माजी आमदार दिलीप माने, विश्वनाथ चाकोते, उज्ज्वलाताई शिंदे, जि. प. माजी अध्यक्ष बळीराम साठे, बाळासाहेब शेळके, राजशेखर शिवदारे, चेतन नरोटे मार्डीचे सरपंच अविनाश मार्तंडे, राकाँचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र हजारे, गणेश पाटील, बाजार समितीचे संचालक जितेंद्र साठे, उत्तर सोलापूर तालुका राष्टÑवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रल्हाद काशिद यांची उपस्थिती होती़
आंबेडकरांच्या नातवाने राज्य घटनेचा खून केला
- एमआयएमसारख्या धर्मांध पक्षासोबत आघाडी करून डॉ. बाबासाहेबांच्या नातवाने राज्यघटनेचा खून केला असून, भाजपा हा नरेंद्र मोदीसारख्या हुकूमशहाचा पक्ष असल्याची टीका काँग्रेसचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी मार्डी येथे केली.
- देशवासीयांनी गेल्या निवडणुकीत मोठ्या अपेक्षेने भाजपला सत्ता दिली; मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांत आपल्या देशातील लोकशाही पूर्णपणे गुंडाळून ठेवली, हे जनतेच्याही आता व्यवस्थित लक्षात आले आहे, अशी टीकाही शिंदे यांनी भाजपवर केली.