आप्पासाहेब पाटील, सोलापूर: राष्ट्रीय महामार्ग अर्जुनसोंड पाटीजवळ (ता. मोहोळ) दुचाकी घसरून झालेल्या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वारास तात्काळ मदतीसाठी धावून जाणारे महामार्ग पोलीस व आरटीओ पथकाचे कर्मचारी यांनी समयसुचकता दाखवून अपघातग्रस्तास जीवदान दिले आहे. यावेळी अर्जुनसोंडचे माजी सरपंच शुक्राचार्य हावळे यांच्या समक्ष जखमीच्या खिशातून पडलेली महत्त्वाची कागदपत्रे आणि रोख एक लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जखमी ज्ञानेश्वर सावंत यांच्या नातेवाईकाकडे सुपूर्द केली.
मोहोळकडून सोलापूरकडे निघालेल्या ज्ञानेश्वर तुकाराम सावंत (रा. सावळेश्वर) यांची दुचाकी घसरून अपघात झाला. या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस विभागाच्या पाकणी टॅबचे पोलीस उपनिरीक्षक धर्मपाल सांगळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणपत माने, पो.ना. विकास यादव आणि सोलापूर आरटीओ पथकाचे कर्तव्यावर निघालेले निरीक्षक शितलकुमार कुंभार, सहाय्यक निरीक्षक विशाल नाझीरकर, अमृता देशमुख, प्रमोद महाडिक यांनी सदर जखमीस त्वरित सोलापूर येथे उपचारासाठी पाठवून दिले. वेळेत जखमीला उपचारासाठी सोलापूरकडे पाठवून जखमींची कागदपत्रे आणि रोख रक्कम उदात्त भावनेने परत करत देवदूत ठरलेल्या आरटीओ विभागाचे मोटार वाहन निरीक्षक शितलकुमार कुंभार व महामार्ग विभागाचे कर्मचारी यांचे अर्जुनसोंडचे माजी सरपंच शुक्राचार्य हावळे यांनी आभार व्यक्त केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"