पंढरपूर : भंडीशेगाव (ता. पंढरपूर) परिसरातील वाढत्या उन्हाळ्यामुळे विंधन विहीर, बोअरची पाणीपातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. उन्हाळी हंगामात नीरा उजवा कालवा व उजनी कालव्याचे हक्काचे पाणी काही शेतकर्यांना न मिळाल्याने भंडीशेगाव परिसरातील पिके जळण्याच्या मार्गावर आहेत. भंडीशेगाव परिसरात गेल्या दोन वर्षांपासून भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. या दुष्काळी परिस्थितीत पाणी पातळी वाढावी, पावसाचे पाणी त्या त्या परिसरात जिरावे यासाठी परिसरातील ओढे, नाले, बंधार्यातील गाळ काढण्याची मोहीम सहकार शिरोमणी साखर कारखान्याच्या वतीने राबविण्यात आली होती. त्यानंतर दुष्काळावर मात होईल, अशी आशा बाळगून असणार्या शेतकर्यांवर पुन्हा निराशाच आल्याचे चित्र आहे. उन्हाळी हंगामाचे नीरा उजवा कालवा व उजनी कालव्याची पाणी पाळी झाली. मात्र दोन्ही विभागाकडून पाणी वाटपाचे कोणतेही नियोजन न झाल्याने काही शेतकर्यांना पाणी मिळाले, तर काहींना मिळालेच नाही. या नियोजनाचा फटकाही लहानमोठ्या शेतकर्यांना बसून पिकांचे मोठे नुकसान होत आहे. सध्या उन्हाची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे पाणी पातळीही दिवसेंदिवस खालावत आहे. विहीर, बोअर व अन्य पाणी स्त्रोत दिवसेंदिवस कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. त्याचा फटका शेतीला मोठ्या प्रमाणात बसत आहे. दिवसेंदिवस खालावत असलेल्या पाणी पातळीमुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट बनत चालला आहे. यामुळे भंडीशेगाव परिसरात पिण्याच्या पाण्याचीही कृत्रिम टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे.
--------------------------
शेतकर्यांवर पुन्हा संकट ४मागील दोन वर्षांच्या भीषण दुष्काळी परिस्थितीनंतर मागील वर्षी समाधानकारक पाऊस झाला होता. या परिसराला वरदान ठरलेले वीर-देवधर व उजनी धरण १०० टक्के भरले होते. याशिवाय परिसरातील बंधारे, विहिरीही तुडुंब होत्या. त्यामुळे यावर्षी दुष्काळ जाणवणार नाही, या आशेवर या परिसरातील शेतकरी होता. मात्र पाण्याचे योग्य नियोजन न झाल्याने पुन्हा दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शेतकर्यांवर पुन्हा संकट ओढवल्याचे चित्र आहे.