२३ डिसेंबरपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने गावागावात गावपुढारी प्रभागनिहाय उमेदवार निवडताना आरक्षणाबरोबरच मतांच्या गोळाबेरजेसह ‘तो’ निवडून कसा येईल, याचा सारासार विचार करून फायनल करीत आहेत. मतमोजणी झाल्यावर १८ जानेवारीनंतर आरक्षण सोडत निघणार असल्याने सरपंच पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयारीला लागलेल्या इच्छुकांची चांगलीच गोची झाली आहे. अशा परिस्थितीत निवडणुकीचा खर्च कोणी करायचा, याचाही सारासार विचार करून अनेक गावपुढाऱ्यांनी खिशाला झळ नको म्हणून ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी प्रयत्नही सुरू आहेत. असे असले तरी बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी असंतुष्ट इच्छुकांनी अर्ज भरल्याने गावपुढारी चांगलेच राजकीय कोंडीत सापडले आहेत.
६१ ग्रामपंचायतींसाठी २९ व ३० डिसेंबर रोजी अर्ज दाखल करण्यासाठी चारचाकी, दुचाकी वाहनातून मोठ्या संख्येने नागरिक आल्याने तहसील कार्यालयाच्या परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते. अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या पुढारी, कार्यकर्त्यांसह इच्छुक उमेदवारांनी तहसील कार्यालयासमोर व अहिल्यादेवी होळकर सभागृहाच्या परिसरात व कचेरी रोडवर चारचाकी, दुचाकी वाहने रस्त्यावर वेडीवाकडी उभी केल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. पोलिसांनी नेमकी हीच संधी साधून अनेक दुचाकींवर दंडात्मक कारवाई सुरू केल्यामुळे रस्त्यासह परिसराने मोकळा श्वास घेतला.
चुका टाळण्यासाठी नेत्यांची धावपळ
तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृहात ३५ ते ४० टेबलवर ऑनलाइन, ऑफलाइन अर्ज स्वीकारले जात होते. गर्दी टाळण्यासाठी इच्छुक उमेदवारांनाच अर्ज दाखल करण्यासाठी आत सोडले जात होते. त्यामुळे कागदपत्रे, अर्ज भरताना झालेल्या चुका यामुळे नेतेमंडळींना धावपळ करावी लागत असल्याचे दिसून आले.