सचिन कांबळे
सोलापूर / पंढरपूर : श्री विठ्ठल मंदिरात विकास कामे सुरू आहेत. या कामादरम्यान मूर्तीला धोका निर्माण होऊ नये, मूर्ती सुरक्षित राहावी. यासाठी १५ मार्च पासून दीड महिना पदस्पर्श बंद राहणार आहे. तर दिवसभरात फक्त पाच तास विठ्ठलाचे मुख्य दर्शन भाविकांना घेता येणार असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी सांगितले.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक सहाय्यक अध्यक्ष ह.भ.प. गहीनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षते खाली भक्त निवास येथे घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, प्रांत अधिकारी सचिन इथापे, तहसिलदार सचिन लंगुटे, व्यवस्थापक बालाजी पुदलवार, सदस्य संभाजी शिंदे, हभप ज्ञानेश्वर महाराज जळगावकर देशमुख, शकुंतला नडगिरे, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, ह.भ.प. शिवाजीराव मोरे, यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.
विठ्ठलाच्या मूर्तीचे संवर्धन करण्यासाठी गर्भगृहातील ग्रॅनाईट फारशी काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये पुढील तीन महिने विठ्ठलाचे दररोज ५ तास मुखदर्शन सुरू असणार आहे. तसेच विट्ठलाच्या मूर्ती संरक्षणासाठी बुलेटप्रुफ काचेचे संरक्षण कवच निर्माण करण्यात येणार आहे. मंदिरातील आणि खास करू विठ्ठलाच्या गर्भगृहातील बदल करण्यासाठी १५ मार्च पासून पुढील काळात हे काम सुरू असणार आहे. साधारण ४५ दिवसाचा जरी कालावधी लागत असला तरी ऐनवेळी येणाऱ्या अडचणी लक्षात घेता ५ जून पर्यंत मंदिराचे सर्व काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे आता भाविकांना ३० फुटांवरून मुखदर्शन मिळणार आहे. तर पुढील ४५ दिवस मूर्ती संवर्धनासाठी भाविकांना आता पदस्पर्श दर्शन करता येणार नाही. यामध्ये येणाऱ्या चैत्री यात्रा कालावधीत भाविकांना पूर्ण वेळ मुखदर्शन मिळणार आहे.