सोलापूर : येथील श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडकाम करावयाचे आहे, त्यासाठी कारखान्याचे गाळप आजच बंद करण्याबाबतचे पत्र सोलापूर महापालिकेच्यावतीने देण्यात येणार आहे. याबाबत महापालिका आयुक्त म्हणाले की, कारवाईला स्थगिती नाही, त्यामुळे गाळप थांबविण्याविषयी आज कारखान्यास पत्र देणार असल्याचे सांगितले.
विमान उड्डाणास अडथळा ठरणारी कुमठे येथील श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या को- जनरेशनची चिमणी पाडकामास मुंबई उच्च न्यायालयाने पंधरा दिवसांची स्थगिती दिली आहे; पण या कालावधीत प्रशासकीय बाबी पूर्ण करण्यास हरकत नसल्याचे मनपा प्रशासनाकडून सांगण्यात आले. विमान उड्डाणास अडथळा ठरणारी सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या को- जनरेशनची चिमणी पाडकामाबाबत महापालिकेने कारखाना प्रशासनाला सात दिवसांची नोटीस बजावली होती. या नोटिसीविरोधात कारखाना प्रशासनातर्फे ॲड. रूपेश बोबडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यात त्यांनी सध्या गळीत हंगाम सुरू आहे. चिमणी पाडकाम केल्यास कारखान्याचे कामकाज थांबून शेतकरी सभासदांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे तूर्त चिमणी पाडकाम करू नये, अशी विनंती केली. यावर सुनावणी होऊन महापालिकेने १५ डिसेंबरपर्यंत चिमणी पाडकाम करू नये, असा आदेश न्यायालयाने दिल्याचे सहायक विधान सल्लागार संध्या भाकरे यांनी सांगितले. मात्र, अशी स्थगिती दिली तरी चिमणी पाडकामाची प्रशासकीय प्रक्रिया करण्यास कसलीही बाधा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कारखान्यातर्फे दोन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. दोन्ही याचिकेची एकत्रित सुनावणी घ्यावी, असे महापालिकेतर्फे ॲड. दिलीप बोडके यांनी म्हणणे मांडल्याचेही त्यांनी सांगितले.