सोलापूर : प्लास्टिक बंदीमुळे शहरातील २५0 बेकरी चालकांना व्यवसाय बंद ठेवावा लागत असल्याचे निवेदन महापालिका आयुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील यांना देण्यात आले.
शहरातील बेकरी चालक संघटनेचे ६0 सदस्य महापालिकेत एकत्र आले. त्यांनी उप आयुक्त ढेंगळे—पाटील यांची भेट घेऊन प्लास्टिक बंदीच्या आदेशामुळे बेकरी व्यवसाय धोक्यात आल्याचे निवेदन दिले. बेकरीतील माल नाशवंत असतो. उत्पादनानंतर हा माल तातडीने पॅकिंग करणे आवश्यक असते. त्यासाठी प्लास्टिक पिशव्याच आवश्यक होत्या. पण आता बंदी आदेशामुळे उत्पादन बंद झाले आहे. ज्यांच्याकडे पूर्वीच्या पिशव्या होत्या त्यांनी याचा वापर केल्यास दंडात्मक कारवाई सुरू झाल्याने व्यावसायिकांनी बेकरी बंद ठेवणेच पसंत केले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. बेकरीचा माल उघड्यावर ठेवून चालत नाही. त्यावर माशा बसतात आणि साथीचा उपद्रव होऊ शकतो. झोपडपट्टीतील अनेक लोकांची गुजराण बेकरीच्या पदार्थावर चालते. त्यामुळे बेकरी उत्पादनासाठी पॅकिंग करण्यासाठी अडचणी येत असल्याची कैफियत त्यांनी मांडली. शिष्टमंडळात बेकरी चालक धनंजय हिरेमठ, जगदीश हिरेमठ, रमेश माने, विनोद मगजी, अ. सत्तार दर्जी यांचा समावेश होता. शासनानेच प्लास्टिकवर बंदी घातली आहे. त्यामुळे नाईलाज असल्याचे ढेंगळे—पाटील यांनी सांगितले. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या २८ जून रोजीच्या बैठकीत काय सूचना येतात ते पाहू असे ते म्हणाले.