रिॲलिटी चेक
विलास जळकोटकर
सोलापूर : कोरोना महामारीमुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. हा संसर्ग व्यापक स्वरूपात पसरू नये, यासाठी शासनाकडून शहर-जिल्ह्यासाठी सायंकाळी चारपर्यंत निर्बंध घातले आहेत. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून कडक अंमलबजावणी केली जात असतानाही शहरात अनेक ठिकाणी पुढून किराणा दुकाने, हॉटेलचे शटर बंद करून पाठीमागून जेवण वा किराणा साहित्य सहज मिळू लागले आहे. शुक्रवारी सायंकाळी शहरभर फेरफटका मारला असता हे वास्तव समोर आलं.
शहरातील गजबजलेल्या बसस्थानकामध्यील कँटीन सुरू असल्याचं दिसून आले. येथे बाहेरून पार्सल देणं सुरू होतं; मात्र याच आवारातील स्टेशनरी दुकानं मात्र निर्बंधांच्या वेळेनंतरही उघडी असल्याचं दिसून आलं. तेथून पुढे बाळीवेस, मधला मारुती, कोंतम चौक, चाटी गल्ली, कुंभारवेस परिसरात एखाद्दुसरं दुकान वगळता शटरडाऊन होतं. मात्र, काहींनी समोरचं शटर बंद ठेवून आतून सेवा सुरू असल्याचे चित्र पहायला मिळालं. कॉलनी, नगरांमधील किराणा दुकाने, दूध डेअरींची सेवा मात्र बिनधास्त सुरू असल्याचं चित्र दररोज पहायला मिळू लागलं आहे.
-----
कोरोनाकाळात दुकानदारांवर कारवाई
पहिल्या लाटेनंतर - १२३५
दुसऱ्या लाटेनंतर - ५०४
-----
कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करा. जे कोणी निर्बंध वेळेनंतरही दुकाने, आस्थापना उघडी ठेवतील त्यांच्यावर कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
- मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी
----
या दुकानांवर लक्ष कोणाचे?
निर्बंधानंतरही दुकाने, स्टेशनरी, हॉटेल उघडे ठेवणाऱ्यांविरुद्ध पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत असलेल्या सातही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अधिकाऱ्यांना पेट्रोलिंग करून कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी मोबाइल व्हॅनसह डीबी पथक तैनात ठेवले आहे. तसेच महापालिकेचे पथकही यासाठी तैनात केले आहे.
----
हे घ्या पुरावे...!
कन्ना चौक : सायंकाळी ५.४५
एकीकडे नियम पाळून निर्बंधांची वेळ संपताच दुकाने बंद केली जात असताना कन्ना चौक परिसरात मात्र सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास नाष्टा सेंटर, बाजूला चहा, पाणीपुरीसाठी लोकांनी गर्दी केल्याचंही दिसून आलं. आजूबाजूला शुक शुक करून पोलीस गाडी तर आली नाही ना, याचा कानोसा घेतला जात असल्याचे पहायला मिळाले.
-----
शुक्रवार पेठ : ५.३०
रिमझिम पावसातही किराणा दुकानाचा दरवाजा अर्धवट लावून ग्राहकांना हवं ते देण्यासाठी दुकानदार बाहेरच उभा असल्याचं चित्र शुक्रवार पेठ परिसरात दिसून आलं. दुचाकीवरून आलेल्या ग्राहकाला हवं ते साहित्य दिलं जात होतं. विजापूर वेस परिसरातही तुरळक ठिकाणी अशीच स्थिती दिसून आली.
----
काय हवंय सांगा मिळेल
- कोरोना संसर्गाची भीती न बाळगता चोरून मागल्या दाराने सेवा पुरविण्याचे काम सुरू असल्याचं अनेक ठिकाणी दिसून आलं. दुकान अथवा हॉटेलच्या बाहेर एखादी व्यक्ती थांबते. ग्राहक आला की, त्याला पाठीमागच्या दिशेने पाठवून दिले जाते. यावरून निर्बंधाची ठरवून दिलेली वेळ हा फार्सच ठरू लागला आहे.
------