सोलापूर : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या अक्कलकोटचे विद्यमान आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांनी काँग्रेसकडूनच निवडणूक लढविणार असल्याचा मंगळवारी निर्णय घेतला आहे़ माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची त्यांनी भेट घेतली. त्यावेळी शिंदे यांनी ‘तुमचं काय झालं’ असा सवाल केला. त्यावर म्हेत्रे यांनी मी कुणाकडे उमेदवारी मागितली नाही, काँग्रेसतर्फेच निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट केले. त्यावर शिंदे यांनी जा, कामाला लागा असा आदेश दिला, त्यानंतर त्यांच्या स्वीय सहाय्यकाने सोशल मिडियावर ही पोस्ट व्हायरल केली़ याबाबत म्हेत्रे यांना विचारले असता काँग्रेसतर्फेच माझी उमेदवारी फायनल असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या अनेक दिवसांपासून आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांनी भाजपकडून उमेदवारी मिळावी म्हणून मुंबई वाºया केल्या होत्या़ आषाढी एकादशीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर दौºयावर आल्यावर विमानतळावर त्यांनी भेट घेतली होती़ त्यामुळे म्हेत्रे यांच्या भाजप प्रवेशाबाबत चर्चा सुरू झाली़ पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी त्यांच्या प्रवेशासाठी प्रयत्न केले होते़ पण गेल्या दोन ते तीन दिवसांमधील घडामोडीमुळे म्हेत्रे याचे नाव मागे पडले़ अक्कलकोटला परतल्यानंतर त्यांनी काँग्रेसमधूनच निवडणुक लढविण्याचा मंगळवारी निर्णय जाहीर केला आहे़ काँग्रेस पक्षातर्फे अद्याप अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली नाही, पण ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी आदेश दिल्यामुळे म्हेत्रे यांनी काँग्रेसचाच अधिकृत उमेदवार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.