सोलापूर : कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेतील चार प्रमुख सोहळे कसे असतील, याचा आराखडा पोलिसांनी तयार केला आहे. मानाचे सातही नंदीध्वज यात्रेच्या आधी मंदिरात आणले जातील. तैलाभिषेक अन् अक्षता सोहळ्याच्या दिवशी ६८ लिंगांच्या प्रदक्षिणेसाठी नंदीध्वजांचे प्रतीक म्हणून केवळ योगदंड असणार आहे, असे आराखड्यात म्हटले आहे. तसा दुजोरा पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर यांनी ‘लोकमत’ला दिला आहे.
यंदा वाजंत्रीसह मिरवणुकीला फाटा मिळणार आहे. नऊ-साडेनऊशे वर्षांची परंपरा असलेल्या यात्रेत खंड पडू नये याचा विचारही आराखडा तयार करताना पोलीस आयुक्तालयाने केला आहे. अक्षता सोहळ्याला मंदिरातील नंदीध्वज सम्मती कट्ट्यावर येतील. त्यानंतर अक्षता सोहळा पार पडेल. दुसऱ्या दिवशीही याच पद्धतीने नंदीध्वज होम मैदानावर येतील आणि होम प्रदीपन सोहळा होईल. तिसऱ्या दिवशी सकाळी नंदीध्वजांना गंगास्नान आणि इतर विधी होतील. या सर्व विधींसाठी पंचकमिटीचे सदस्य, मानकरी, नंदीध्वजधारक अशा ५० जणांंनाच परवानगी असणार आहे, असे आराखड्यात नमूद करण्यात आले आहे. कदाचित राज्य शासन याच आराखड्याला मंजुरी देतील, असे पोलीस आयुक्तालयाकडून सांगण्यात आले.
शोभेचे दारूकाम नाहीच
शोभेच्या दारूकामावेळी यात्रेतील विधी नसतातच. केवळ मनोरंजन आणि परंपरा म्हणून शोभेचे दारूकाम सोहळा पार पडत असतो. त्या दिवशी सकाळी मंदिर परिसरात नंदीध्वजांना गंगास्नान आणि मानकऱ्यांना विडा देण्याचा कार्यक्रम असतो. तो सोडला तर दिवसभर कुठलाच विधी नसतो. हा धागा पकडून यंदा शोभेचे दारूकाम सोहळ्याला फाटा देण्यात आल्याचे आराखड्यावरून समजते.
योगदंडाच्या पूजेनंतर प्रसादाला निवडकच : थोबडे
पुढील महिन्यात १२ तारखेला तैलाभिषेक सोहळा. १३ रोजी अक्षता, १४ जानेवारी म्हणजे मकर संक्रांतीदिनी होम प्रदीपन सोहळा पार पडणार आहे.. त्याआधी सिद्धरामेश्वरस्थापित अष्टविनायकांची पूजा आणि त्यानंतर १० जानेवारीला शुक्रवार पेठेतील शेटे वाड्यात योगदंडाची पूजा होणार आहे. या पूजेलाही ५० हिरेहब्बू, हब्बू, मानकरी, पंचकमिटीच्या सदस्यांसह ५० जणच असतील. त्यामुळे पूजेनंतर आयोजित महाप्रसादाला इच्छा असूनही निवडक लोकांनाच बोलावावे लागणार असल्याचे मानकरी ॲड. मिलिंद थोबडे, ॲड. रितेश थोबडे यांनी सांगितले.
यंदा अक्षता सोहळा वेळेच्या आतच
कोरोनामुळे यात्रेतील केवळ विधी होणार आहेत. त्यासाठी सातही नंदीध्वज मंदिरातच असणार आहे. १३ जानेवारीला सातही नंदीध्वज मंदिरातून सम्मती कट्ट्याकडे मार्गस्थ होतील. मंदिर ते सम्मती कट्ट्याचा मार्ग कमी अंतराचा असल्याने नंदीध्वज वेळेत पोहोचेल. त्यामुळे अक्षता सोहळा सकाळी ११ पर्यंत पार पडेल, असा अंदाज आराखड्यावरून बांधता येतो.