भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे यांचे चुलत बंधू सिद्धेश्वर आवताडे यांनी अखेर उमेदवारीचा अर्ज ठेवला असून अर्ज माघारी काढून घेण्यासाठी सलग तीन दिवस मोहिते-पाटलांनी केलेल्या प्रयत्नांना अपयश आले आहे. त्यामुळे सिद्धेश्वर आवताडे यांचा पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज कायम राहिला आहे. त्यामुळे त्याचा नक्की कोणाला फटका बसणार, याबाबत तालुक्यात चर्चा रंगली आहे.
मंगळवेढा: समाधान आवताडे यांची उमेदवारी भाजपकडून जाहीर झाल्यानंतर त्यांचे चुलतबंधू सिद्धेश्वर आवताडे यांनीही अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांची मतपरिवर्तन करण्यासाठी मोहिते-पाटील पितापूत्रांनी प्रयत्न केले मात्र बंड पुकारत त्यांनी छाननीदिवशी अर्ज कायम ठेवला. याचा फटका कोणाला बसणार याची चर्चा मतदारसंघात सुरु झाली आहे.
तालुक्यात डीसीसी बँकेचे संचालक बबनराव आवताडे यांचे वर्चस्व आहे. त्यांच्या ताब्यामध्ये तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायट्या, ग्रामपंचायती, कारखान्याचे संचालक, खरेदी-विक्री संघाचे संचालक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक असा त्यांना मानणारा वर्ग आहे. खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे यांच्याकडे युवकांचा मोठा फौजफाटा असल्यामुळे भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांची ते किती मतं घेतात यावर बरंच काही अवलंबून राहणार आहे.
मंगळवेढा तालुक्यात ग्रामीण भागात ३५ गावांमध्ये दिवंगत आ. भारत भालके यांना मानणारा मोठा वर्ग आहे. शहर व पश्चिम विभाग तसेच दक्षिणेकडील काही गावे हे भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांना मानणारा युवा वर्ग आहे. गेल्या २०१४ व २०१९ मध्ये तालुक्यामधून भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांना इतरांपेक्षा अधिक मतदान झाले आहे. त्यांच्या ताब्यात पंचायत समिती, तीन झेडपी गट ताब्यात आहेत. यामुळे त्यांचे ग्रामीण भागातील अनेक गावात वर्चस्व आहे. पण त्यांचे सख्खे चुलत बंधू सिद्धेश्वर आवताडे यांनी उमेदवारी अर्ज ठेवल्यामुळे त्यांच्यासमोर तालुक्यातच आव्हान उभे राहिले आहे.
-----
आता निवडणूक बहुरंगी
सलग तीन दिवसांपासून सिध्देश्वर आवताडे यांचा उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील हे एक दिवस तर आ. रणजितसिंह मोहिते-पाटील हे तीन दिवस ठाण मांडून होते. मात्र डी.सी.सी.चे संचालक बबनराव आवताडे यांचे चिरंजीव सिध्देश्वर आवताडे यांचा अर्ज असल्यामुळे ते भूमिकेवर ठाम राहिले. यामुळे आता ही निवडणूक बहुरंगी होत आहे.