साेलापूर -सिध्देश्वर कारखान्याची बेकायदेशीर चिमणी पाडण्यासाठी यंत्रणा घेऊन पुढील आठवड्यात साेलापुरात येताेय, असे बिनियास काॅन्टेेक कंपनीचे संचालक माेहन काेटी यांनी मंगळवारी माध्यमांना सांगितले. दरम्यान, कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीवर चर्चा करण्यासाठी चेअरमन धर्मराज काडादी यांनी बुधवारी सभासदांची बैठक बाेलावली आहे.
महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी चिमणी पाडकामावेळी गाेंधळ हाेऊ नये म्हणून पाेलीस आयुक्तांना अतिरिक्त बंदाेबस्त लावण्याचे पत्र साेमवारी दिले आहे. यावर साेलापूर विकास मंचचे सदस्य लक्ष ठेवून आहेत. काही सदस्यांनी चिमणी पाडकामाचे मक्तेदार असलेल्या बिनियास काॅन्टेक कंपनीच्या संचालकांना मंगळवारी फाेन केले. या कंपनीने आम्हाला अद्याप पालिकेतून निराेप आला नसल्याचे सांगितले. त्यावर सदस्य संतापले. त्यांनी पालिकेचे नगररचना सहायक संचालक माेरेश्वर सुगडे यांच्यासह अधिकाऱ्यांना फाेन केले. यादरम्यान, कंत्राटदाराने निराेप मिळाल्याचे सांगितले. साेमवारपर्यंत यंत्रणा घेऊन येताेय. कारखान्याची चिमणी थंड झाली पाहिजे. चिमणीचे कनेक्शन ताेडले पाहिजे असेही त्यांनी सांगितले.
चिमणी पाडकामावेळी गाेंधळ हाेऊ नये म्हणून साेलापूर विकास मंचच्या सदस्य पाेलिसांकडे पाठपुरावा करीत आहेत. कारखान्याचे माजी संचालक संजय थाेबडे यांनी पाेलीस आयुक्तांना पत्र देऊन कारखाना प्रमुखांवर कारवाईची मागणी केली.
---
सभासद करणार चिमणीवर खल
सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया हाेणार आहे. यापार्श्वभूमीवर कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी संचालक, सभासदांची बुधवारी कारखान्याच्या मंगल कार्यालयात बैठक बाेलावली आहे. या बैठकीत चिमणीचे पाडकाम आणि कारखान्याची भूमिका यावर चर्चा हाेण्याची शक्यता आहे. कारखान्याचे चेअरमन धर्मराज काडादी यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची भेट घेऊन चिमणी पाडकामास स्थगिती देण्याची मागणी केली. कारखान्याचा गळीत हंगाम सुरू असताना कारवाई हाेऊ नये असे निवेदनही त्यांनी दिले आहे.