आप्पासाहेब पाटील, सोलापूर: विमानाच्या नावाने राजकारण करून सिद्धेश्वर साखर कारखाना बंद पाडून शेतकरी कामगारांना उद्धवस्त करू करण्याऱ्या महापालिका प्रशासनाच्या निषेधार्थ माकप अग्रेसर झाली आहे. चिमणी पाडण्याची भूमिका ही शेतकरी कामगारांच्या विरोधात असून जमावबंदी आदेशाचा भंग करून शेतकरी कामगारांसाठी माकप रस्त्यावर उतरला आहे, अशी भूमिका माकप चे जिल्हा सचिव अँड.एम.एच.शेख यांनी व्यक्त केली.
गेल्या अनेक दिवसांपासून सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडण्यासाठी महापालिका प्रशासन अग्रेसर राहिले असून काल दुपारी पासून कारखान्याच्या परिसरात जमावबंदी व मध्यरात्री संचारबंदी लागू करून पहाटे चार च्या सुमारास हजारोंच्या संख्येने पोलीस फौजफाटा तैनात करून तणावपूर्ण वातावरण निर्माण केले. अशा वेळी शेतकरी कामगारांच्या समर्थनार्थ व महापालिका प्रशासनाच्या आठमुठी भूमिकेच्या विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष शेकडो कार्यकर्त्यांना साखर कारखान्या कडे आगेकूच करताना पोलिसांनी माकप चे जिल्हा सचिव अँड.एम.एच.शेख व कॉ.युसूफ शेख मेजर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. माकप चे ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ नरसय्या आडम मास्तर यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन बैठक पार पडली.
त्यानंतर माकप चे जिल्हा सचिव अँड.एम.एच. शेख यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार रात्रभर कार्यकर्ते जागरण करून सकाळी पोलिसांना चकवा देत लाल झेंडे घेऊन पालिका व पोलिस प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणा देत मोर्चा काढला.यावेळी पोलिसांची तारांबळ उडाली. रस्त्यावर ठिय्या मांडताच पोलिसांनी बळाचा वापर करून कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.