राकेश कदम, साेलापूर: सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडल्यानंतर भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख आणि काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या दोघांमध्ये साेशल मीडियावर ‘पाेस्ट वाॅर’ पेटले आहे. मंत्रिपदाच्या आणि आमदारकीच्या काळात ‘तुम्ही काय केले’ असे हे दोघेही एकमेकांना विचारत आहेत. महापालिकेने चिमणी पाडल्यानंतर आमदार प्रणिती शिंदे यांनी कारखान्याचे प्रमुख धर्मराज काडादी यांची भेट घेतली. भाजपने साेलापुरात विमानसेवा सुरू करून दाखवावीच असे आव्हान शिंदे यांनी दिले. यावर भाजपकडून अधिकृत काेणतीही प्रतिक्रिया आली नाही. मात्र, साेलापूर विकास मंचच्या सदस्यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर टीका करणारे पत्रक काढले. हे पत्रक साेशल मीडियावर व्हायरल झाले. आमदार विजयकुमार देशमुख यांनी एका व्हाॅट्सॲप ग्रुपवर हे पत्रक फाॅरवर्ड केले. आमदारच ही पाेस्ट व्हायरल करतात म्हटल्यावर आमदार प्रणिती शिंदे यांच्या कार्यालयातून साेमवारी सायंकाळी देशमुखांवर टीका करणारे पत्रक आले.
प्रणिती शिंदे यांच्या कार्यालयाचे देशमुखांना सवाल
१. तुम्ही ५ वर्षे पालकमंत्री २० वर्षे आमदार असताना किती लाेकांना राेजगार दिली. किती उद्याेग आणले?.२. शहरात बससेवा सुरू करू शकला नाहीत. राेज पाणीपुरवठा करण्याचे वचन दिले. त्याचे काय झाले?३. केंद्रात, राज्यात भाजपची सत्ता आली. साेलापुरात किती नव्या कंपन्या आल्या? पूछता है साेलापूर..४. स्मार्ट सिटीचा शेकडो कोटी रुपये निधी कुठे गेला, कोणाचा विकास केला?५. मार्केट कमिटीचा सभापती झाल्यानंतर जनतेला काय दिले. गाळे वाटपात कोणी गाळा खाल्ला?
देशमुखांनी फाॅरवर्ड केलेल्या पाेस्टमधून शिंदेंना सवाल
१. अनेक वर्षे मंत्रिपद, आमदारकी भाेगून शिंदे पिता-पुत्रीने साेलापूरसाठी काय केले?२. बेकायदेशीर बांधकाम पाडले म्हणून प्रणितींना राग येण्याचे कारण काय?३. चिमणीचे पाडकाम काेर्टाच्या आदेशानुसार झाले. मग ताईंना देशाचे संविधान मान्य नाही का?४. इतर नेत्यांना धडा शिकवणाऱ्या तुम्ही काेण. हे काम तर मतदार करणार.५. विमानसेवा सुरू करुन दाखवा असे तुम्ही म्हणता. तुम्हाला साेलापूरचा विकास नकाेय का?