सोलापूर : होम मैदानावर केवळ विधीच होणार... या चर्चेपाठोपाठ वाहनांना बंदीचा आदेश आला. पाळण्यांचे साहित्य घेऊन येणारी वाहने होम मैदानावर दुपारी दाखल झाल्याने प्रशासनाचा आदेश हवेतच विरला. दीड महिन्यासाठी होम मैदानाचा ताबा पंच कमिटीकडे असल्याने त्यांच्या आराखड्यानुसारच स्टॉल्स, तात्पुरती पोलीस चौकी, पाळणे टाकण्याचे काम होत आहे.
स्मार्ट सिटी अंतर्गत रंगभवन चौक आणि होम मैदानाचे लूक बदलत आहे. होम मैदानाच्या भोवताली लोखंडी ग्रील असलेली संरक्षक भिंत उभारण्यात आली आहे. मैदानाच्या कडेला जॉगिंग ट्रॅकचे कामही पूर्ण झाले आहे. जवळपास ८० ते ९० टक्के काम पूर्णत्वाच्या मार्गावर असताना होम मैदान आता पंच कमिटीच्या ताब्यात देताना महापालिकेने काही अटी घातल्या.
सुरुवातीला पाळणे उभारण्यास बंदी घालण्यात आली. काही दिवसांनंतर वाहनांना प्रवेश बंदीचा आदेशही पुढे आला. पाळण्यांचे साहित्य घेऊन येणाºया वाहनांचे काय ? असा प्रश्न संबंधितांना पडला होता.
दुपारी २ वाजून ३३ मिनिटांनी माहिमहून चार वाहने पाळण्यांचे साहित्य घेऊन होम मैदानावर दाखल झाली. या चारही वाहनांमध्ये पाळणे, झुल्यांचे साहित्य होते. काही तासभरानंतर वाहनांमधील साहित्य उतरवून घेण्यात आले. उद्या (शुक्रवारी) आणखी काही वाहनांमधून पाळणे, झुले, मौत का कुआँ आदी मनोरंजनात्मक खेळांचे साहित्य होम मैदानावर दाखल होणार आहे. शुक्रवारपासून परराज्यातून विक्रेते, व्यापारी आपले स्टॉल्स टाकण्यास प्रारंभ करतील.
‘सिद्धेश्वर मेला’ची आखणी पूर्ण- होम मैदानावर सिद्धेश्वर मेला अर्थातच आनंद मेळा भरणार आहे. या मेळ्याचे संयोजक अभिजित कौर (कोलकात्ता) हे आपल्या सहकाºयांच्या मदतीने पाळणे, झुले, मौत का कुआँ आदींच्या स्टॉल्सची आखणी केली. एक-दोन दिवसांमध्ये वाहनांमधून सर्वच साहित्य होम मैदानावर येईल. त्यामुळे वाहतुकीची कोंडी मुळीच होणार नाही. पुन्हा यात्रा संपल्यावरच आणि वाहतुकीला अडथळा न आणता साहित्य हलविण्यात येणार आहे.