पंढरपूर : सोलापूरला पाणीटंचाई जाणवू लागल्यानंतर उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यात आले आहे. पंढरीतील चंद्रभागा पात्रात पाणी जास्त दिवस टिकून रहावे यासाठी गोपाळपूर बंधारा दारे टाकून अडविण्यात आला आहे, परिणामी जवळच असलेल्या विष्णूपद मंदिराला पाण्याने वेढले आहे. त्यामुळे याठिकाणी दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते. त्यामुळे येथे कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये यासाठी मंदिर समितीच्या वतीने दोन सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.
सध्या पंढरपूर हे धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून उदयास येत आहे. पंढरपुरातील विष्णूपद मंदिर व तुळशी वन हे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहेत. राज्याच्या कानाकोपºयातून आलेला प्रत्येक भाविक प्रथम चंद्रभागेत पवित्र स्नान करतो. त्यानंतर श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेतो. त्यानंतर हमखास शहरातील कैकाडी महाराज मठ, गजानन महाराज मठ, तनपुरे महाराज मठ यासह तुळशी वृंदावन पाहतात.
तसेच गोपाळपूरला जाताना किंवा येताना चंद्रभागेच्या नदीकाठी वसलेले विष्णूपद मंदिरामध्ये विष्णूच्या पाऊलखुणा पाहण्यासाठी जातात. त्या ठिकाणी चंद्रभागा नदीपात्रात नौकाविहार करतात. परंतु सध्या चंद्रभागेमध्ये ज्यादा पाणी असल्यामुळे विष्णूपद मंदिराला पाण्याने वेढा दिला आहे.
विष्णूपद मंदिर पाहण्यासाठी आलेल्या भाविकांची कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये. यामुळे मंदिरे समितीच्या वतीने विष्णूपद मंदिर परिसरात रात्र व दिवस असे दोन शिप्टमध्ये दोन सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली आहे. हे सुरक्षा रक्षक विष्णूपद मंदिर पाहण्यासाठी आलेल्या भाविकांना पाण्यामध्ये जाण्यापासून रोखण्याचे काम करत आहेत.