गावगाड्याची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून गावकारभाऱ्यांची धावपळ वाढली होती. यात अनेक उमेदवार बिनविरोध करण्यासाठी गावकारभाऱ्यांची कसोटी पणाला लागली होती. निवडणुकीत आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी अनोख्या प्रचार पद्धतीचा धडाका गावगाड्यात दिसत होता. मात्र, शुक्रवारी झालेल्या मतदानानंतर आज अनेक गावात शांतता दिसत होती. आता गावकारभाऱ्यांसह मतदारांचेही डोळे निवडणूक निकालाकडे लागले आहेत. बहुतांश गावकारभारी पुढील मनसुबे रंगवण्यात दंग झाल्याचे दिसत होते.
खर्चाचा ताळमेळ...
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने खर्चाची मर्यादा घालून दिली असली तरी या गोष्टी सध्याच्या निवडणुकीत कागदावरच दिसणार आहेत. प्रत्यक्षात मात्र अनेक ग्रामपंचायतींमधील खर्चाचे आकडे वेगळे असणार आहेत. यामध्ये हॉटेल, पानपट्टी, धाबे यांच्या उधारीपासून मतदारांच्या मनधरणीसाठी केलेल्या येनकेन प्रकारांचा हिशोब व प्रशासनाला देण्यात येणारा कागदावरचा हिशोब यांचा ताळमेळ घालताना गावकारभाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.