सोलापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात येणाºया मिरवणुकीच्या खर्चातून आजतागायत साडेतीनशे जोडप्यांच्या रेशीमगाठी बांधण्याचे काम डी.के. मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आले. सामुदायिक विवाह सोहळ्याचा लाभ घेऊन मुंबई, पुणे, कर्नाटकसह गोव्यातील वधू-वरांनी आपला संसार थाटला आहे.
२00२ मध्ये संस्थेची स्थापना झाली़ समाजासाठी काही तरी चांगला उपक्रम राबवावा, असा विचार करीत असताना स्वत:च्या बहिणीच्या लग्नावेळी आलेला वाईट अनुभव डोळ्यासमोर ठेवून संस्थापक दशरथ कसबे यांनी सामुदायिक विवाह सोहळ्याचा निर्णय घेतला. मुकुंदनगर येथे लोकवर्गणीच्या माध्यमातून साजरी होणारी मिरवणूक बंद केली. जमा झालेल्या पैशातून सर्वधर्मीय समाजातील गरजू जोडप्यांचे लग्न करण्याचे ठरवले. २00७ साली मुकुंदनगरातील भिमाई चौकात प्रथमत: ११ जोडप्यांचा विवाह लावून दिला. पहिल्या वर्षी मिळालेला प्रतिसाद आणि लोकांच्या सदिच्छा पाहून २00८ साली पुन्हा १८ जोडप्यांचा सामुदायिक विवास सोहळा पार पडला.
लग्नाला येणाºया वºहाडी मंडळींना जागा अपुरी पडू लागल्याने २00९ साली भवानी पेठेतील काडादी मंगल कार्यालयाच्या मैदानावर २८ जोडप्यांचा शाही विवाह सोहळा लावून दिला. प्रतिवर्षी जोडप्यांची संख्या वाढू लागली़ एखाद्याचा संसार उभा राहत असल्याने देणगीदारही पुढे आले. सर्वसामान्य गरीब कुटुंबातील लग्नकार्य म्हणजे भविष्यातील कर्जाचा डोंगर. हा डोंगर नाहीसा करून संस्थेने मणी मंगळसूत्र, कपड्यांपासून संसारोपयोगी साहित्य देऊन अनेकांची चिंता मिटवण्याचे काम केले जात आहे.
लग्नाचा थाट पाहून शहर, जिल्हा, परजिल्हा आणि परराज्यातील लोकही विवाह सोहळ्यात नोंदणी करून आपले कार्य पार पाडत आहेत. सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून खºया अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करणारी संस्था म्हणून डी.के. मागासवर्गीय सामाजिक संस्थेची ओळख निर्माण झाली. सलग आठ वर्षे मिरवणुकीला फाटा देत सामुदायिक विवाह सोहळा पार पाडला. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव विवाह सोहळ्याचा खर्च बाजूला काढून गेल्या दोन वर्षापासून पुन्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मिरवणूक काढली जात आहे.
अन् विवाह सोहळ्याची संकल्पना पुढे आली : कसबे- आम्ही लहान असताना बहिणीचे लग्नकार्य निघाले. वडील हॉटेलमध्ये कामाला होते, आई मार्केटमध्ये भाजी विकत होती. लग्न करण्याची ऐपत नव्हती, नातेवाईकांकडे पैशाची मागणी केली असता वाईट अनुभव आला. मुकुंदनगरातील ज्येष्ठ नेत्यांनी बहिणीच्या लग्नासाठी वर्गणी काढली होती. हा अनुभव आमच्यासाठी खूप वाईट होता, तो डोळ्यासमोर ठेवून मोठे बंधू दशरथ कसबे यांनी सामुदायिक विवाह सोहळ्याची संकल्पना मांडली आणि ती आज मोठ्या स्वरूपात अस्तित्वात आली आहे, अशी माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष गौतम कसबे यांनी दिली.
संस्थेच्या माध्यमातून आजवर पार पडलेल्या विवाह सोहळ्यातील जोडपे जेव्हा कधी भेटतात तेव्हा खूप समाधान वाटते. या सोहळ्यासाठी मुकुंदनगरातील प्रत्येक घरातून आर्थिक मदत केली जाते़ त्यामुळे त्यांचा या कार्यात सिंहाचा वाटा आहे. हा सोहळा कधीही बंद पडू देऊ नका, तुमच्यामुळे आज आमचा संसार आहे, अशी भावना विवाह झालेले जोडपे व्यक्त करतात. मुलांना घेऊन आशीर्वाद घेण्यासाठी येतात तेव्हा मी भारावून जातो. - दशरथ कसबे, संस्थापक डी.के. मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्था, सोलापूर.