सोलापूर : शहरातील काही भागात एकच प्लॉट एकापेक्षा अधिक लोकांना विकल्याचे अनेक प्रकार घडत आहेत. या प्रकारामुळे सर्वसामान्यांची मोठी फसवणूक होत आहे; पण असे प्रकार करणारे भूमाफिया मात्र मोकाटच फिरत आहेत. अशा भूमाफियांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. गेल्या वर्षभरात जमिनीसंबंधित फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.
गुंतवणूक म्हणून अनेकजण प्लॉट खरेदी करतात. प्लॉट खरेदी करत असताना शक्यतो अनेकजण गावठाण भागामध्ये खरेदी करतात. अशा प्रकारच्या प्लॉटमध्ये कोणत्याही प्रकारचे बांधकाम करीत नाहीत. अनेकवेळा तर त्या जागेवर तार कंपाउंड मारले जात नाही. परगावी राहत असल्याने त्या प्लॉटकडे जातही नाहीत. याचाच फायदा घेत काही व्यक्ती त्यावर अतिक्रमण करीत असल्याचे प्रमाण वाढले आहे.
पण आता गुन्ह्याचे प्रकार बदलत आहेत. सध्या जागेच्या अफरातफरीपेक्षा अनेक गुन्हेगार ऑनलाईन फसवणूक किंवा इतर माध्यमातून फसवणूक करत आहेत. अशा ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. भविष्यात जमिनी संबंधातले घोटाळे कमी होतील, असे मत जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे.
यामुळे फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. हद्दवाढ भागामध्ये प्लॉट खरेदी करून त्याकडे वर्षानुवर्षे दुर्लक्ष न करता त्या जागेकडे महिन्यातून दोन वेळा जाऊन प्लॉटची पाहणी करावी. शक्य झाल्यास त्याठिकाणी बोर्ड लावावा, असे आवाहन जाणकारांकडून केले जाते.
एक एक पैसा जमा करत राहण्यासाठी घर शोधत असताना जुळे सोलापूरमध्ये खुली जागा एकाने दाखवली. ती जागा त्याने एकाला खरेदी करून दिली, तर दुसऱ्याला साठेखत करून दिले. यामुळे तक्रार देऊनही अद्यापपर्यंत आम्हाला न्याय मिळाला नाही.
- तक्रारदार
अशोक चौकातील एक जागा मित्राने दाखवली. त्याच्यावर विश्वास ठेवून जागेची रक्कम ठरल्यानंतर इसारा म्हणून दीड लाख रुपये दिले. नंतर त्याने ती जागा देण्यास नकार देत इसाराही दिला नाही. तक्रार करतो असे म्हटल्यावर मी अमुक संघटनेचा आहे, असे म्हणत दमदाटी केली. यामुळे आम्ही हतबल झालो.
- तक्रारदार
प्लॉट बळकावल्याच्या तक्रारी
- २०१९ - २४
- २०२० - २७
- २०२१ (मे पर्यंत) - १६
सोळा जणांचे विशेष पथक
आर्थिक गुन्ह्याची तक्रार आल्यानंतर त्याबाबतचा शोध आणि तपास लावण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. यात एकूण १६ जणांचा समावेश आहे.
पूर्वी बळजबरीने जागेचा ताबा घेणे अशा घटना घडत होत्या; पण अशाप्रकारे ुगुन्हेगारी करणार्यांवर कारवाई झाल्यामुळे ही संख्या खूप कमी होत आहे. तरीही एक जमीन अनेकांना देणे किंवा अन्य गुन्हे घडत आहेत. अशा गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी तक्रारदारांनी पुढे येऊन तक्रार द्यावी.
- संजय साळुंखे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, प्र. आर्थिक गुन्हे शाखा
-
इन्फो बॉक्स
तक्रारींचे पुढे काय
एखाद्या व्यक्तीची जागेबद्दलची फसवणुकीची तक्रार असल्यास त्याबद्दल तक्रार घेतली जाते. जर त्या तक्रारीची रक्कम २५ लाखांच्या आत असेल तर पोलीस ठाण्याच्या अधिकार्यांकडे त्याचा तपास सोपवला जातो. जर पंचवीस लाखांपेक्षा वरील तक्रार असल्यास ती तक्रार आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केली जाते. त्यानंतर चौकशी केली जाते व गुन्हा दाखल करत असताना विधि अधिकाऱ्यांचा सल्ला घेतला जातो. त्यानंतर पुढील गुन्हा दाखल केला जातो.