हातभट्टीची कारवाई झाली तरीही काही कालावधीनंतर पुन्हा हातभट्टी सुरू केल्या जातात. कायद्यातील पळवाटांचा आधार घेत अवैध धंदे, गुन्हेगारी सुरूच राहते. अशा गावांची यादी तयार करून खाकीने एका नव्या धोरणांचा अवलंब स्वीकारला. ऑपरेशन परिवर्तनच्या माध्यामातून गुन्हेगारीची ओळख पुसण्याचा चंग बांधला आहे. सन्मानजनक व्यवसायासाठी मार्गदर्शन, लागणारे कर्ज, शासकीय मदत, यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन केले जात आहे. अशा कुटुंबातील मुलांनी अवैध व्यवसाकडे आकर्षित होऊ नये यासाठी त्यांना करिअर मार्गदर्शन करून गुन्हेगारांचे मन परिवर्तनासारखे प्रयोग राबविताना दिसत आहे.
चिंतनाचा विषय
गुन्हेगारी प्रवृत्तीपासून मन परिवर्तनासाठी पोलीस प्रयत्न करीत असले तरी या प्रयत्नांना कितपत यश मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण व्यावसायिकांसमोरील प्रचंड अडचणी, बेरोजगारी, दारिद्र्य अशा अनेक गोष्टी या लोकांसमोर आ वासून उभ्या आहेत. याशिवाय नैसर्गिक आपत्ती, भ्रष्टाचार, आदी गोष्टींमुळे अवैध व्यवसायातील हातखंडा किती नागरिक बदलणार, हा चिंतनाचा विषय ठरणार आहे.
अवैध व्यावसायिकांवर कारवाईबरोबरच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन परिवर्तनाचा प्रयोग हा या व्यावसायिकांना बाहेर पडण्याची एक चांगली संधी आहे. त्यामुळे त्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने पोलीस सर्वतोपरी सहकार्य करणार आहेत. यामुळे अशा व्यावसायिकांनी यात सहकार्य करावे.
- निरज राजगुरू
उपविभागीय पोलीस अधिकारी, अकलूज
हातभट्टी ओळख पुसणार..
सवतगव्हाण (उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरू), अकलूज, भगवेवस्ती (पोनि. अरुण सुगावकर), विझोरी (सपोनि मारकड), शिंदेवाडी व धर्मपुरी (सपोनि मनोज सोनवलकर), गुरसाळे, बैनवाड, चांदापुरी (पोनि दीपरत्न गायकवाड), पिलीव (सपोनि शशिकांत शेळके), पठाणवस्ती (पोसई आदिनाथ महारनवर), पारधीवस्ती-वेळापूर (खारतोडे) ही तालुक्यातील दहा गावांची कारवाई व मन परिवर्तनातून हातभट्टीची ओळख पुसण्यासाठी दत्तक घेतली आहेत.