पंढरपूर : कोरोना महामारीनं प्रत्येकानंच हाय खाल्लीय.. मात्र जबर इच्छाशक्तीच्या जोरावर अनेकजण बरे होऊन आपल्या कुटुंबात सुखरूप पोहोचताहेत. पंढरपुरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेले कोरोना पॉझिटिव्ह पोलीस अंमलदार २५ दिवसांनंतर बरे होऊन हॉस्पिटलबाहेर आले. बाहेर येताच त्यांचे वरिष्ठ उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी हार घालून स्वागत केले. त्यावेळी आपसूकपणे ठाणे अंमलदारांच्या तोडी एकच वाक्य आलं, ‘साहेब तुमच्यामुळेच वाचलो, नाही तर गेलोच होतो.’ असं म्हणत त्याने हात जोडून खाकी वर्दीला सलाम केला.
सांगोला येथे कार्यरत असलेले दीपक भोसले यांना कोरोना लागण झाली. त्यांचा न्युमोनिया स्कोर १३ होता, तर त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची मात्रा ६५ ते ७० च्या आसपास होती. त्यामुळे सांगोला पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांनी पंढरपूर उपविभागीय पोलीस अधीक्षक विक्रम कदम यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर त्यांनी त्या काेरोना पॉझिटिव्ह रुग्णाला तात्क़ाळ लाईफ लाईन रुग्णालयात ऑक्सिजन बेड मिळवून दिला. परंतु दीपक भोसले यांच्या प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा झाली नाही. भोसले यांना रेमडेसिविर व अन्य महागडे इंजेक्शन व गोळ्या देण्यात आल्या.
जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते व अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मदतीने विक्रम कदम यांनी इंजेक्शनची सोय केली. दीपक भोसले यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर २४ दिवसांनंतर त्यांना हॉस्पिटलमधून सोडण्यात आले. भोसले हॉस्पिटलच्या बाहेर येताच उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, सपोनि प्रशांत भागवत, पोलीस नीलेश कांबळे यांनी हार घालून त्यांचे स्वागत केले. यावेळी दीपक भोसले यांचा कंठ दाटून आला अन् आपसूकच डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांनी सद्गदित होऊन ‘साहेब तुमच्यामुळे वाचलो...’ म्हणत आभार व्यक्त केले.
----
महिन्यात ६२ पोलिसांवर उपचार
सध्या पंढरपूर येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. तात्काळ ऑक्सिजनचे बेड उपलब्ध होत नाहीत. यामुळे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी पोलिसांना व त्यांच्या कुटुंबांना उपचार कमी खर्चात व्हावेत व तात्काळ ऑक्सिजन बेड मिळावेत यासाठी पंढरपुरातील रुक्मिणी पाेलीस संकुल येथे कोविड केअर सेंटर सुरू केले. कोविड सेंटरचे कामकाज सपोनि प्रशांत भागवत पाहत आहेत. या कोविड केअर सेंटरमध्ये पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबांतील अशा ६२ जणांवर उपचार करण्यात आले आहेत. त्याचबरोबर शेकडो पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
---
फोटो :::
पोलीस अंमलदार दीपक भोसले यांनी कोरोनावर मात केल्यानंतर त्यांचे स्वागत करताना उपविभागीय पोलीस विक्रम कदम.